उजनी परिसरात टँकर मागविण्याची वेळ
By Admin | Published: April 10, 2017 02:10 AM2017-04-10T02:10:00+5:302017-04-10T02:10:00+5:30
उजनी धरणासारखे मोठे धरण असूनही भिगवण आणि परिसरातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी
भिगवण : उजनी धरणासारखे मोठे धरण असूनही भिगवण आणि परिसरातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर मागवावा लागण्याची वेळ आल्याने ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ म्हणीची आठवण नागरिकांना आल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. याला ज्याप्रमाणे शासन जबाबदार आहे, त्याचप्रमाणे तालुक्याचे आजी-माजी लोकप्रतिनिधीही जबाबदार असल्याचे नागरिकांतून बोलले जाते.
भिगवण, तक्रारवाडी, मदनवाडी, विरवाडी, पोंधवडी गावाला प्रत्येक उन्हाळ्यात या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यावर कोणताही कायमस्वरूपी उपाय काढला जात नाही. २५ किलोमीटर अंतर असणाऱ्या बारामतीला भिगवणहून पाणीपुरवठा केला जात असताना, दोन-तीन किलोमीटर इतक्या कमी अंतरावरील गावांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ येत आहे. पाणीपुरवठा योजना उन्हाळा आला की, कुचकामी ठरतात आणि नागरिकांना शासनाकडे मदत मागावी लागते. तक्रारवाडी हे गाव उजनी धरणाच्या कडेला वसले असून, या गावालादेखील उन्हाळ्यात पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. कोणतीही पाणी योजना तयार करताना भविष्यातील नागरीकरण याचा विचार होत नाही. या योजनेतून मिळणाऱ्या हिस्सेदारीमुळे कायमस्वरूपी समस्या दूर होईल, अशा प्रकारे काम होताना दिसून येत नाही.
प्रत्येक पावसाळ्यात पुढील वर्षी नक्की बांधू, असा संकल्प करण्यापेक्षा या तीनही गावांना पाणी कायमस्वरूपी मिळावे, असे वाटत असेल तर उजनी धरणात बुडीत बंधारा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. याविषयी शासन दरबारी तालुक्याचे लोकप्रतिनिधी तसेच लोकसहभागासाठी सामाजिक संस्था यांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. याप्रकारे बुडीत बंधाऱ्याची संकल्पना दौंडचे माजी आमदार स्व.सुभाष कुल आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी प्रत्यक्षात उतरवली असल्याचे उदाहरणही आहे.
भिगवणसारख्या सातत्याने वाढ होत असलेल्या गावालाही पाणीपुरवठा करताना अडचणींचा सामना करावा लागत असून, यावर गावप्रतिनिधी यांच्याकडून कायम स्वरूपी उपाय केला जात नसल्याचे या दिवसात दिसून येत आहे.
गावाचा विस्तार आणि वाढ होत असलेली नागरिकांची संख्या तसेच मिळणाऱ्या उत्पन्नातून असलेल्या योजना चालविताना ग्रामपंचायतीपुढे यक्ष प्रश्न निर्माण होताना दिसून येत आहेत.
मदनवाडी गावाला पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाली असून, पदाधिकारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत सामान्य नागरिकांना वेठीस धरत असून, या गावालाही पाणी कायमस्वरूपी मिळेल, अशी योजना राबविली जात नसल्याची स्थिती आहे.
वडापुरीतील विहिरींची पाणीपातळी घटली
वडापुरी : सध्या दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. वडापुरी परिसरातील विहिरींची पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे येणारे दोन ते तीन महिने कसे जातील, याचाच प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांंना उन्हाळ्यात विहिरींना पाणी चांगले राहील व उन्हाळा हंगामातील पिके चांगली येतील, असे वाटत होते.
परंतु, पडत असलेल्या कडक उन्हामुळे विहिरींचे पाणी कमी झाले असल्याने उन्हाळ्यातील मका, भुईमूग इत्यादी पिके येतील का नाही, याचीच काळजी आत्तापासूनच सर्वांना वाटू लागली आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू
झाली असून, आपापल्या शेतात पिकांना पाणी कमी पडू नये म्हणून पाण्यासाठी बोअर
घेण्यास तालुक्यातील शेतकऱ्यांची लगबग सुरू झाले असल्याचे पाहावयास मिळते.
उन्हाळ्यातील दोन-तीन महिने कसे जातील, याचाच सध्या
मोठा प्रश्न पुढील काही
दिवसांत भेडसावणार
असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे आहे.