मोबाइलवर मिळणार रुग्णांना डॉक्टरांची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 06:41 AM2018-05-14T06:41:42+5:302018-05-14T06:41:42+5:30
ग्रामीण भागातील रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आहेत की नाही याची माहिती तसेच तपासणीसाठी अपॉर्इंटमेंट आता घरबसल्या घेता येणार आहे.
पुणे : ग्रामीण भागातील रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आहेत की नाही याची माहिती तसेच तपासणीसाठी अपॉर्इंटमेंट आता घरबसल्या घेता येणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे भोर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या धर्तीवर मोबाइल अॅप विकसित करण्यात येणार आहे. या अॅपमध्ये जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांची माहिती राहणार असून, या अॅपवरच तपासणी रिपोर्टही रुग्णांना घरबसल्या मिळणार आहे.
जिल्ह्यातील आरोग्य केेंद्रे दिवसेंदिवस कात टाकत आहेत. या आरोग्य केंद्रांत येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. बरेचदा रुग्णांना दवाखान्यात डॉक्टर नसल्याने परत जावे लागते. तसेच त्यांना तपासणी रिपोर्टसाठीही ताटकळत बसावे लागते.
रुग्णांना होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी भोर तालुक्यातील भोंगावली येथील आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी पुढाकार घेऊन एक अॅप विकसित केले होते. या अॅपवर रुग्णांना तपासणी अहवाल मिळत होता. याचे उद्घाटनही मोठ्या थाटात करण्यात आले होते. याच अॅपच्या धर्तीवर आता संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांची पूर्ण माहिती असलेले अॅप जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे विकसित करण्यात येणार आहे. या अॅपद्वारे घरबसल्या रुग्णांना डॉक्टर रुग्णालयात आहेत की नाही याची माहिती मिळणार आहे. त्यानुसार त्यांना डॉक्टरांची अपॉर्इंटमेंटसुद्धा घेता येणार आहे.
जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांची वर्गवारी या अॅपवर राहणार असून, त्या त्या केंद्राच्या परिसरातील रुग्णांना त्यांच्या केंद्राची संपूर्ण माहिती अॅपवर मिळेल. तसेच आरोग्य विभागाच्या योजनांची माहितीही यावर देण्यात येणार आहे.
यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण अॅपच्या माध्यमातून हायटेक होणार आहे. सध्या आरोग्य विभागातर्फे सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र इंटरनेटद्वारे जोडण्याचे काम सुरू आहे.
या अॅपद्वारे येथील रुग्णांना त्यांचा तपासणी अहवाल मोबाइलवर मिळतो. सध्या प्रायोगिक तत्त्वावर हे अॅप सुरू आहे. या अॅपप्रमाणेच आरोग्य विभागाकडून संपूर्ण जिल्ह्यासाठी सर्व सोयी-सुविधांनी उपयुक्त असलेले नवे आधुनिक अॅप विकसित करण्यात येत आहे.
नागरिकांना घरबसल्या या अॅपचा वापर करून डॉक्टरांची वेळ घेता येईल. डॉक्टर उपलब्ध नसतील तर लाल रंगाचे चिन्ह आणि उपलब्ध असल्यास हिरव्या रंगाचे चिन्ह डॉक्टरांच्या नावापुढे असणार आहे. भोर तालुक्यातील भोंगवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक आरोग्य दिनानिमित्त येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल राठोड, सुशांत मोहिते यांनी हे अॅप विकसित केले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येणाºया रुग्णांना ओपीडी नंबर दिला जातो. या क्रमांकाद्वारे भविष्यात त्यांची माहिती अद्ययावत ठेवली जाणार आहे. त्यांच्यावर कुठले उपचार केले, त्यांना कुठली औषधे दिली हेही या क्रमांकामुळे समजणार आहे. पुढच्या वेळेला रुग्ण दवाखान्यात आल्यास त्यांना या क्रमांकाद्वारे त्यांची माहिती मिळणार आहे. ही सर्व माहिती आॅनलाईन असल्याने दरवेळी ओपीडीची कागदपत्रे त्यांना बाळगणे गरजेचे राहणार नाही. यासारख्या अनेक महत्त्वाच्या बाबी या अॅपमध्ये राहणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली.