भर पावसाळ्यात पिकांना स्प्रिंकलरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:09 AM2021-07-02T04:09:21+5:302021-07-02T04:09:21+5:30
--- कान्हूर मेसाई : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई परिसरात जून महिन्याच्या सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी घाई करत ...
---
कान्हूर मेसाई : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई परिसरात जून महिन्याच्या सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी घाई करत मूग सोयाबीन काळेवाल, राजमा आदी पिकांची पेरणी केली. मात्र गेल्या दहा-बारा दिवसापासून अचानक पावसाने उघडीप दिल्याने पिके वाचविण्यासाठी जमिनीतून माना काढलेल्या पिकांना स्प्रिंकलरने पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची, खैरेनगर, खैरेवाडी, शास्ताबाद, मिडगुलवाडी आदी भागात जूनच्या पहिल्या आठवड्यातच दमदार पाऊस झाला मृग नक्षत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. याच आशेवर शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खरेदी करून खरिपाच्या पेरण्या ओळखल्या होत्या आता हे सर्व शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
शिरूर तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. त्यातच मागचा दहा-बारा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने जमिनीतून मानवावर काढलेल्या पिकांचे नुकसान होताना दिसून येत आहे. ज्यांच्याकडे विहीर अशी सिंचनाची व्यवस्था आहे. अशा शेतकऱ्यांकडून पिकांना वाचवण्यासाठी भर पावसाळ्यात स्प्रिंकलरने पाणी देण्याची वेळ आली आहे.
--
दुबार पेरणीची भीती
--
यंदा अगोदरच खत बी बियाणे यांच्या भावात मोठी वाढ झाली आहे, अशातच पावसाने मारलेली दडी व किडीचा झालेला प्रादुर्भाव या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. गट तीन चार दिवसापासून आकाशात काळेकुट्ट ढग जमा होत असून पावसाचा टिपूसही पडत नसल्याने शेतकरी धास्तावल्याचे चित्र आहे. पावसाची पिकांना नितांत गरज असून पावसाअभावी जमिनीतून वर आलेले कोवळे अंकुर करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली असल्याचे माजी सरपंच दादा खर्डे आणि उपसरपंच दीपक तळोले यांनी सांगितले .
--
फोटो क्रमांक : ०१ कान्हूर मेसाई
फोटो ओळी : कान्हुर मेसाई परिसरात मागील दहा-बारा दिवसापासून पावसाने खंड पडल्याने शेतात पेरलेल्या बिया उगवून न आल्यामुळे तुषार सिंचनाद्वारे पाणी देण्यास सुरुवात केली आहे.