टँकरच्या पाण्याने बागा जगविण्याची वेळ
By admin | Published: April 9, 2016 01:49 AM2016-04-09T01:49:21+5:302016-04-09T01:49:21+5:30
परिसरामध्ये झालेल्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे पाण्याची पातळी खोल गेली आहे. दुष्काळामध्ये डाळिंबबागा जोपासणे शेतकऱ्यांपुढे एक आव्हान बनले आहे.
निमगाव केतकी : परिसरामध्ये झालेल्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे पाण्याची पातळी खोल गेली आहे. दुष्काळामध्ये डाळिंबबागा जोपासणे शेतकऱ्यांपुढे एक आव्हान बनले आहे. या परिस्थितीमध्ये बागा टिकवण्यासाठी येथील शेतकरी सध्या टँकरने पाणी घालून डाळिंबबागा सांभाळताना दिसत आहेत. तर दुसरीकडे, पाण्याच्या शोधासाठी बोअरवेल, विहिरी खोदणे यासाठी कर्ज काढून लाखो रुपये मातीत घालत आहेत. मात्र, पाणीपातळी खोल गेल्याने पाणीच लागत नसल्याने या परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
उन्हाळ्यात तोडणीला येणाऱ्या बागांना चांगला बाजार सापडतो. त्यामुळे या परिसरातील अनेक शेतकरी एप्रिल, मेमध्ये बागातोडणीसाठी येण्याच्या हिशेबाने बागांची मशागत करतात. या बागा छाटणीपासून खते कीटकनाशके तसेच व इतर खर्च मोठ्या प्रमाणात होतो. डाळिंबबागा जोपासताना थोडाही हलगर्जीपणा शेतकरी करीत नाहीत. अशाच प्रकारे याही वर्षी शेतकऱ्यांनी या परिसरामध्ये आपल्या बागा जोपासल्या आहेत. परंतु, अचानक पाणीटंचाई निर्माण झाल्याने बागा जळून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बागांमध्ये दोनशे-अडीचशे ग्रॅम वजनाचा माल तयार झाला आहे; परंतू पाणीटंचाईच्या भयानक संकटामुळे शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
जी पाणीटंचाई मे महिन्यामध्ये असते ती चालू वर्षी एक महिना आगोदर जाणवत आहे. यामुळे अनेक बागा पाण्याअभावी जळण्याची भीती निर्माण झाली आहे. बागा जोपासण्यासाठी आजपार्यंत झालेला खर्च मातीत जाणार असल्याचे चित्र सध्या या ठिकाणी आहे. (वार्ताहर)
मात्र, अशा परिस्थितीही आपल्या बागा टिकवण्यासाठी मिळेल तेथून पाणी मिळवून टँकरने ते बागांना देण्याचा प्रयत्न शेतकरी करताना दिसत आहेत.
याबाबत आधिक माहिती देताना निमगाव केतकी येथील डाळिंब उत्पादक शेतकरी दादासाहेब निवृती शेंडे यांनी सांगितले, की इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या चार-पाच वर्षांमध्ये डाळिंबाचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. हे क्षेत्र जवळपास २५ हजार एकरांवर झाले आहे. या वाढत्या क्षेत्राला पाण्याची अवश्यकता वाढली आहे.
परंतु, सध्या उन्हाच्या दाहकतेमुळे पाणीपातळी खोल गेल्याने पाणीटंचाई निर्माण झाले आहे. याची झळ या भागातील डाळिंबबागांना बसत असल्याचे दिसत आहे. या पाणीटंचाईतून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक मार्ग शोधले आहेत. यामध्ये शेततळ्याचा वापर ठिबक सिंचनासारखे प्रयोग करूनही शेतकऱ्यांच्या पाठीमागची साडेसाती संपत नाही, असे दिसत आहे.
सध्या तर पाण्याची आधिकच गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या बागा पाण्याअभावी जळताना दिसत आहे. काही शेतकरी मात्र टँकरने पाणी आणून बागा जगवण्यासाठी धडपड करीत आहेत. एक टँकर विकत घेण्यासाठी एक हजार दोनशे ते दीड हजार रुपये मोजावे लागत आहेत. यामध्ये वाहतुकीचा खर्च होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्याला कर्जबाजारी होण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे शेंडे यांनी सांगितले.
डाळिंबबागांबरोबरच इतरही थोडीफार पिके शेतकऱ्यांकडे आहेत. परंतु, पाण्यासाठी सर्वच पिके जळताना दिसत आहेत. हे शेतकऱ्यांच्या डोळ्यांना बघवत नसल्याने काही शेतकरी बोरवेल घेत आहेत. तर, काही आपल्या जुन्या विहिरीतील गाळ काढणे व खोली वाढवणे आशी कामे करीत आहेत.
शेतकऱ्यांना एक विंधन विहीर घेण्यासाठी व त्यामध्ये विद्युतपंप बसवण्यासाठी जवळपास ७० ते ८० हजारांपर्यंत खर्च करावा लागत आहे. हा खर्च कर्ज काढून शेतकरी करीत आहेत. मात्र, एवढा खर्च करूनही अनेक विधंन विहिरी तात्पुरत्या चालून बंद पडतात. यामुळे शेतकरी आणखी संकटात सापडतो.(वार्ताहर)