काळ आला होता पण.... रेल्वे पोलिसांनी वाचविले महिलेचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 03:30 PM2018-04-14T15:30:28+5:302018-04-14T15:30:28+5:30
पुणे ते लोणावळा दरम्यानचा प्रवास गंगावणे कुटुंबासह करत होते.
पिंपरी : पुणे ते लोणावळा दरम्यानचा प्रवास गंगावणे कुटुंबासह करत होते. गर्दीमुळे पाय घसरून चिंचवड रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म ३ वर पडल्या. त्याचवेळी प्रसंगावधान दाखवुन पी. टी. कर्दळे आणि अनिल बागुल या रेल्वे पोलिसांनी तिला बाहेर ओढले. पोलिसांच्या तत्परतेमुळे गंगावणे कुटुंबावरील मोेठे संकट टळले. ही घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.
पुण्याहून लोणावळयाच्या दिशेने धावणाऱ्या रेल्वेमधून नीता संजय गंगावणे (वय ३१, रा. पनवेल),संजय रामचंद्र गंगावणे (वय ३९) हे दांपत्य मुलगा सिद्धार्थ (वय ८) याला बरोबर घेऊन प्रवास करत होते. चिंचवड येथील रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर प्रवाशांच्या झालेल्या गर्दीमुळे नीता गंगावणे यांचा पाय घसरला व त्या तोल जाऊन धावत्या रेल्वेखाली अडकणार अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे लक्षात येताच पोलीस कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. नीता गंगावणे यांना त्यांनी प्लॅटफॉर्मवरून लगेच बाहेर ओढले. काळ आला होता,पण वेळ आली नव्हती असेच शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले. जीव वाचविण्यासाठी पोलिसांच्या रूपात प्रत्यक्ष ईश्वरानेच धाव घेतली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. जीव वाचविल्याबद्दल नीता गंगावणे यांनी पोलिसांचे आभार मानले.