महामार्ग देखभालीची वाहतूक पोलिसांवर वेळ, ठेकेदार कंपनीचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 11:23 PM2018-09-30T23:23:29+5:302018-09-30T23:25:06+5:30
पुणे-नाशिक मार्ग :
खेड : पुणे-नाशिक मार्गाची वाहतूककोंडी सोडविण्याबरोबरच या मार्गाची देखभाल करण्याची वेळही वाहतूक पोलिसांवर आली आहे. दुरुस्ती आणि देखभालीची जबाबदारी रस्ता बांधणाऱ्या ठेकेदार कंपनीवर असतानाही त्यांच्या तर्फे केवळ बघ्याची भूमिका घेतली जात आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडीचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. पिंपरी-चिंचवडचे प्रथम आयुक्तपद्मनाभ यांनी यावर तातडीने उपाय योजले. एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तसेच पंधरा कर्मचारी व ट्रॅफिक वार्डन वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी नेमण्यात आले. १५ दिवसांत याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. धोरणात्मक उपाय आणि ठोस कारवाईने वाहतूककोंडी सुसह्य झाली. वाहतूककोंडीला फक्त जणू पोलीसच जबाबदार असल्याची धारणा झाली आहे. टोल वसूल करणारी आय आर बी कंपनी आणि महामार्ग विभाग फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत.
वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी महाळुंगे सर्कल येथील वाहतूक नियंत्रक दिवे बसवून ते पोलिसांनी सुरू करून घेतले. पूर्वी मंजूर झालेली येथील सिग्नल यंत्रणा उदासीनतेमुळे कार्यान्वित करण्यात आली नव्हती.
चाकण-तळेगाव रस्त्यावर हिंदुस्थान पेट्रोलीयमच्या चौकात लवकरच सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
सर्व्हिस रस्ता आणि मुख्य रस्ता यातील दुभाजक नष्ट झाले होते. त्यामुळे वेडीवाकडी वाहने जात असत. वाहतूककोंडीस हे एक कारण होते. दुभाजकाचे हे दगड बसविण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.
त्याचबरोबर स्पायसर चौकातील वाहतूक नियंत्रक दिवाही सुरू करण्यात
आला आहे. एकूणच पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे वाहतूककोंडीत लक्षणीय घट झाली आहे.