पोट भरण्यासाठी तमाशा कलावंतांवर मजुरी करण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:10 AM2021-03-20T04:10:20+5:302021-03-20T04:10:20+5:30

कोरोनामुळे लाखो रुपयांचे नुकसान : उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर पुणे : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून गावजत्रा बंद असल्यामुळे तमाशा फडांचे लाखो ...

Time to hire spectacle artists to fill their stomachs | पोट भरण्यासाठी तमाशा कलावंतांवर मजुरी करण्याची वेळ

पोट भरण्यासाठी तमाशा कलावंतांवर मजुरी करण्याची वेळ

Next

कोरोनामुळे लाखो रुपयांचे नुकसान : उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर

पुणे : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून गावजत्रा बंद असल्यामुळे तमाशा फडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तीन हंगाम वाया गेल्यामुळे तमाशातील कलाकारांना उदरनिर्वाह करणेही कठीण झाले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी तमाशा कलावंत शेतमजुरी, रोजंदारीची कामे करत आहेत. अनेकांना दिवसभर मजुरी करूनही पोटभर अन्न मिळत नसल्याची खंत तमाशा कलावंतांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण देशभरात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातही अनेक गावांतील यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वर्षभरापासून बंद असलेले तमाशा फड यंदा सुरू होण्याची आशा मावळली आहे. विठाबाई भाऊ नारायणगावकर तमाशा फडाचे प्रमुख मोहीत नारायणगावकर म्हणाले की, कोरोनामुळे कलाकारांवर बिगारी काम करण्याची वेळ आली आहे. आमच्या फडात कलाकारांसह एकूण ९० जण आहेत. मात्र, एक वर्षापासून त्यातील अनेकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दसऱ्यापासून ते गुडीपाडव्यापर्यंत आमचे तमाशाचे तीन हंगाम होतात. कोरोनामुळे एकही हंगाम मिळविता आला नाही. अशा परिस्थितीतही कलाकारांना आवश्यक ती सर्व मदत केली. मात्र, अनेक जण उदरनिर्वाह करण्यासाठी मोलमजुरी करत आहेत. २०१६ मध्ये नोटाबंदी झाल्यापासून तमाशा व्यावसायावर संकट कोसळले आहे. त्यानंतर, दुष्काळ, निवडणुका यामुळे व्यवसाय संकटातच होता. कोरोनामुळे व्यवसायावर कुऱ्हाड कोसळली आहे.

संगमनेरचे तमाशा कलावंत रघुवीर खेडकर म्हणाले की, कोरोनामुळे एक वर्ष वाया गेल्यानंतर यंदा परिस्थिती पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा होती, पण पुन्हा रुग्ण वाढले. त्यामुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. तमाशा कलावंत संभाजी कोल्हे म्हणाले की, वर्षभरापासून सरकारला मदतीसाठी आवाहन करत आहोत. मात्र, सरकारने दुर्लक्ष केले आहे. तमाशा बंद असल्यामुळे वर्षभरापासून उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर आहे. मुलाकडून मिळणाऱ्या पैशांवरच सध्या पोट भरत आहे. मुलाकडूनही पैसे मिळाले नाही, तर मजुरीच्या कामावर जातो.

सरकारचे दुर्लक्ष

तमाशा कलावंत संकटात असून, त्यांना मदत करावी, यासाठी वारंवार सरकारला निवेदन देण्यात आले. मात्र, तरीही सरकारने अद्याप कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे सरकारच्या मदतीवर विश्वास नसल्याचे कलाकारांनी सांगितले.

ऐन हंगामात तमाशावर संकट

गुडीपाडवा ते बौद्धपौर्णिमा या काळात पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिकमध्ये गावजत्रा, यात्रा यांमुळे तमाशाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, कोरोना रुग्ण वाढू लागल्याने ऐन हंगामातच तमाशा व्यावसायावर संकट कोसळले आहे.

(फोटो - कोंडीराम आवळे)

संपूर्ण आयुष्य तमाशासाठी दिले आहे. ७४व्या वर्षी कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. वगनाट्य लिहिणारा मी कलाकार या संकटाच्या काळात उदरनिर्वाह कसा करू, असा प्रश्न आहे.

- कोंडीराम आवळे, तमाशा कलावंत

(फोटो - रघुवीर खेडकर)

सरकारला मदतीचे आवाहन करूनही काहीही उपयोग झाला नाही. आमच्या फडात १३० कलावंत आहेत. कोरोनामुळे एका वर्षात मोठ्या फडाचे दोन ते अडीच कोटी आणि लहान फडाचे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या कलाकार पडेल ते काम करून उदरनिर्वाह करत आहेत.

- रघुवीर खेडकर, तमाशा कलावंत

------------------------------------

Web Title: Time to hire spectacle artists to fill their stomachs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.