...त्या त्या वेळी मला इतिहासाचा नव्याने साक्षात्कार होतो; राज ठाकरेंचे बाबासाहेब पुरंदरेंबद्दल गौरवोद्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 04:03 PM2021-07-29T16:03:42+5:302021-07-29T16:09:29+5:30
बाबासाहेबांनी त्यांच्या लेखनातून इतिहासाला धक्का लावला नाही आणि दंतकथांना शिरकाव करू दिला नाही.
पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज १०० व्या वर्षात पदार्पण केलं आहे. या निमित्ताने राज्यभरातून आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी बाबासाहेबांची भेट घेत त्यांना भगवी शाल, पगडी आणि गुलाबांच्या फुलांचा पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. याचवेळी ठाकरे यांनी पुरंदरेंबद्दल गौरवोद्गार देखील काढले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेपुणे दौऱ्यावर असून याच दरम्यान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा वाढदिवस आल्याने 'दुग्धशर्करा योग' जुळून आला. या निमित्ताने पुण्यात राज ठाकरे यांनी बाबासाहेब यांच्या घरी जाऊन त्यांना १०० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना बाबासाहेबांबद्दल गौरवोद्गार काढले.
ठाकरे म्हणाले, बाबासाहेबांनी त्यांच्या लेखनातून इतिहासाला धक्का लावला नाही आणि दंतकथांना शिरकाव करू दिला नाही. इतिहासाच्या पानात जे सापडलं आणि जे खरं आहे तेच लोकांसमोर मांडलं. एखादी दंतकथा असेल तर ते तसं सांगतात.या कथेला आधार नाही असाही आवर्जून उल्लेख ते करतात. सांगणं हे त्यांचं काम असून जाणून घेणं आपलं काम आहे.
बाबासाहेबांनी आज वयाची शंभरी गाठली आहे. पण, त्यांच्यात काहीही फरक पडलेला नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज आहे तसं आहे. वयामुळे शरीर जरा थकलेलं आहे. पण त्यांचं बोलणं, स्मरणशक्ती आणि संदर्भ देण्याची हातोटी पूर्वीसारखेच आहे. आणि ज्या ज्या वेळी मी बाबासाहेबांना भेटतो, त्या त्या वेळी इतिहासाचा पुन्हा नव्याने साक्षात्कार होतो असे गौरवोद्गार ठाकरे यांनी यावेळी काढले.
राज ठाकरे यांनी सांगितला 'फडणवीस' नावाचा 'इतिहास'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. एखादा शब्द कुठून कसा तयार झाला, त्याचं उगमस्थान काय याबद्दलही माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी फडणवीस या आडनावाबद्दलही अनोखी माहिती दिली.
फडणवीस या आडनावाचं उदाहरण दिलं. या आडनावाचा उगम सांगताना राज ठाकरे म्हणाले, फडणवीस हे आडनाव फर्दनवीस या पर्शियन शब्दावरुन आलेलं आहे. फर्द म्हणजे कागद आणि नवीस म्हणजे लिहिणारा. कागदावर लिहिणारा म्हणजे फर्दनवीस. पण मग नंतर फडावर लिहिणं आलं. आणि म्हणून ते फडणवीस असं झालं. आडनावं अशी असतात. या गोष्टी कुठून आल्या, कशा आल्या. आणि मला या सगळ्या गोष्टींमध्ये फार रस आहे.