त्यावेळी त्या चिमुकल्याला वाचवायला हवं एवढाच विचार केला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 06:18 PM2019-02-04T18:18:35+5:302019-02-04T18:31:29+5:30
बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकल्याला केशवनगर येथील सुरक्षारक्षक विकास भोकरे यांनी जीवाची पर्वा न करता वाचवले. यात विकास यांच्या खुब्याचे हाड मोडले असून सध्या ते ताराचंद रुग्णालयात उपचार घेत आहेत.
राहुल गायकवाड
पुणे : पुण्यातील शहरी भागात आज सकाळी बिबट्या आल्याने खळबळ उडाली. केशवनगर भागात आलेल्या या बिबट्याने 5 नागरिकांना जखमी केले. या बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकल्याला येथील सुरक्षारक्षक विकास भोकरे यांनी जीवाची पर्वा न करता वाचवले. यात विकास यांच्या खुब्याचे हाड मोडले असून सध्या ते ताराचंद रुग्णालयात उपचार घेत आहेत.
आज सकाळी पुण्यातील केशवनगर भागात बिबट्या शिरला. रहिवासी भागात बिबट्या आल्याने या भागात दहशतीचे वातावरण होते. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 5 जण जखमी झाले. विकास हे येथील लेबर कॅम्प भागात सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. त्यांची रात्रपाळी संपण्याची वेळ होत आली होती इतक्यात बिबट्या परिसरात आल्याची माहिती त्यांना मिळाली. पुढच्या काही क्षणात बिबट्या त्यांना एका चिमुकल्याच्या दिशेने येताना दिसला. क्षणाचाही विलंब न करता विकास चिमुकल्याच्या दिशेने धावले आणि त्याला बाजूला केले. बिबट्याने त्यांना धडक दिली. त्यामुळे ते शेजारी असलेल्या एका इमारतीच्या डक मध्ये कोसळले. यात त्यांच्या डोक्याला मार लागल्याने ते बेशुद्ध झाले तसेच त्यांचा खुब्याचे हाड सरकले.
लोकमतशी बोलताना विकास म्हणाले, काही दिवसांपूर्वी येथील काही नागरिकांना बिबट्या दिसला होता. याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. आज सकाळी 6. 40 च्या सुमारास बिबट्या अचानक केशवनगर भागात आला. मी त्यावेळी कामावर होताे. लोक बिबट्या आल्याचे सांगत पळत होते. पुढच्या काही क्षणात बिबट्या माझ्या समोर होता. बिबट्या एका चिमुकल्यावर हल्ला करण्याचा तयारीत होता. मी कसलाही विचार न करता त्या चिमुकल्याला बाजूला केले. बिबट्याने मला जोराची धडक दिली त्यामुळे मी बाजूला असलेल्या एका डक मध्ये कोसळलो.
सध्या विकास हे ताराचंद रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना अद्याप प्रशासनाकडून कुठलीही मदत मिळाली नाही. त्यांचा खुबा सारकल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. परंतु घरी हलाखीची परिस्तिथी असल्याने रुग्णालयाचा खर्च कसा देणार असा प्रश्न त्यांच्या समोर आहे.