त्रासामुळे महिला डॉक्टरवर नोकरी सोडण्याची वेळ
By admin | Published: July 12, 2016 02:09 AM2016-07-12T02:09:16+5:302016-07-12T02:09:16+5:30
पाषाण येथील महापालिकेच्या दवाखान्यात कार्यरत असणाऱ्या एका महिला डॉक्टरला वॉर्डबॉयकडून होत असलेल्या त्रासाबद्दल त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी
पुणे : पाषाण येथील महापालिकेच्या दवाखान्यात कार्यरत असणाऱ्या एका महिला डॉक्टरला वॉर्डबॉयकडून होत असलेल्या त्रासाबद्दल त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तक्रारी करूनही कुणीच दखल घेत नसल्याने महिला डॉक्टरवर नोकरी सोडण्याची वेळ आली आहे. पालिकेकडे डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात वानवा असताना प्रशासनाच्या अनास्थेमुळे डॉक्टरांना नोकरी सोडण्याची वेळ आली आहे.
महिला डॉक्टरने वॉर्डबॉयविरुद्ध तक्रारीचा महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर सोमवारी अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी त्यांची बाजू ऐकून घेतली. मात्र अतिरिक्त आयुक्तांनी या वेळी तुमचा शारीरिक छळ झाला नाही, हा प्रशासकीय त्रुटींचा विषय आहे, वॉर्डबॉय तुम्हाला आता त्रास देत नाही ना, अशी विचारणा करीत त्यांच्या तक्रारीमध्ये काही तथ्य नसल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला.यामुळे संबंधित महिला डॉक्टर अत्यंत व्यथित झाल्या असून, त्यांच्यापुढे नोकरी सोडण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ‘‘तक्रारदार डॉक्टर महिलेची बाजू ऐकून घेतली. त्यांची ज्याच्याविरुद्ध तक्रार आहे, त्यांचीही बाजू ऐकून घेतली जाईल. ’’
महापालिकेच्या पाषाणमधील दवाखान्यात एक स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या डॉक्टरला या विदारक अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. दवाखान्यात काम करीत असताना वॉर्डबॉयकडून सातत्याने त्रास दिला जात असल्याबद्दल त्यांनी आॅक्टोबर २०१५मध्ये आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र, राजकीय दबावामुळे कारवाई करू शकत नसल्याचे उत्तर त्यांना देण्यात आले. त्याचबरोबर त्यांनी महिला तक्रार निवारण समितीकडे जावे असा सल्ला त्यांना देण्यात आला.
महापालिकेच्या महिला तक्रार निवारण समितीकडे त्यांनी वॉर्डबॉयची तक्रार दाखल केली. त्यानुसार साक्ष, जबाबही नोंदवून घेण्यात आले. मात्र अचानक महिला तक्रार निवारण समितीने त्यांची तक्रार आरोग्य विभागाकडे वर्ग केली. दरम्यानच्या काळात त्या महिला डॉक्टर व वॉर्डबॉयची वेगवेगळ्या ठिकाणी बदली करण्यात आली. महिला डॉक्टरची कमला नेहरू रुग्णालयामध्ये बदली करण्यात आली आहे.
...लेखी लिहून आणा : महिला डॉक्टरने वॉर्डबॉयविरुद्ध तक्रार करण्यासाठी वरिष्ठांकडे धाव घेतल्यानंतर राजकीय दबावामुळे कारवाई करू शकत नसल्याचे वरिष्ठांकडून त्यांना सांगण्यात आले. ते त्यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर वरिष्ठ अधिकारी राजकीय दबावामुळे बदली करू शकत नसल्याचे त्यांच्याकडून लेखी लिहून आणावे, असे अतिरिक्त आयुक्तांनी त्या महिला डॉक्टरला सांगितले.
भावाला फोन करून धमकी : महिला डॉक्टरने संबंधित वॉर्डबॉयविरुद्ध महापालिकेतील अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर, वॉर्डबॉयने तिच्या भावाला फोन करून, तक्रार थांबवा नाहीतर बघून घेईन असे धमकावल्याची तक्रार करण्यात आली आहे.