चार खासदार असणाऱ्या शरद पवारांवर राजकीय निवृत्तीची वेळ
By admin | Published: January 22, 2017 04:37 AM2017-01-22T04:37:54+5:302017-01-22T04:37:54+5:30
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे खासदार कधी पक्ष सोडतील याची शाश्वती नाही, लोकसभेत केवळ चार खासदार असणाऱ्या शरद पवार यांची राजकीय निवृत्तीची वेळ आली आहे.
बारामती : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे खासदार कधी पक्ष सोडतील याची शाश्वती नाही, लोकसभेत केवळ चार खासदार असणाऱ्या शरद पवार यांची राजकीय निवृत्तीची वेळ आली आहे. पंतप्रधानांना बारामतीची एकच बाजू दाखवण्यात आली, त्यामुळे त्यांनी कौतुक केले. मात्र, सतत दुष्काळात असलेल्या अर्ध्या बारामतीची परिस्थिती वेगळीच आहे. बारामती तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही, ही वस्तुस्थिती देखील पुढे आली पाहिजे, अशी परखड टीका सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली.
बारामती तालुक्यातील कारखेल येथे आयोजित शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना देशमुख यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार, अजित पवार यांच्यावर टीका केली. अर्ध्या बारामतीची जनता दुष्काळाने ग्रस्त आहे, असे असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदान करून नेते तयार केले काय अशी शंका येते, अशीही टीका त्यांनी केली. अजित पवार यांच्या कार्यकाळात सिंचनावर ७० हजार कोटी रुपये खर्च झाले, परंतु बारामतीचा दुष्काळदेखील त्यांना हटवता आला नाही, यासारखे दुर्दैव नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शरद पवार २००४ मध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. ते शक्य झाले नाही. आता तर तशी परिस्थिती राहिलेली नाही. सध्या केवळ चार खासदार असलेल्या पवारांना निवृत्तीची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीचा दौरा केला. तो पवार यांच्या खासगी संस्थांचा. त्यांना बारामतीचा एक भाग दाखवण्यात आला. परंतु, उर्वरित बारामतीची स्थिती वेगळीच आहे. हे चित्रदेखील जगापुढे आले पाहिजे. त्यांच्या पक्षाच्या खासदारांची स्थिती देखील दोलायमान आहे. ते कधी पक्ष सोडतील, याची शाश्वती नाही, अशी टिप्पणीदेखील त्यांनी केली. यावेळी महात्मा फुले समता परिषदेच्या तालुकाध्यक्षांसह अन्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश करताना छगन भुजबळ यांना तुरुंगात डांबण्याची व्यवस्था राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच केली, असा आरोप केला. (प्रतिनिधी)