नियोनजामुळे वेळेत झाली मतमोजणी
By admin | Published: February 24, 2017 03:20 AM2017-02-24T03:20:00+5:302017-02-24T03:20:00+5:30
एकाच प्रभागात मिळून सर्व गटांचे तब्बल ५१ उमेदवार, उर्वरित दोन प्रभाग निवडणुकीपासूनच
पुणे : एकाच प्रभागात मिळून सर्व गटांचे तब्बल ५१ उमेदवार, उर्वरित दोन प्रभाग निवडणुकीपासूनच संवेदनशील झालेले. मतमोजणी केंद्रांच्या भोवती प्रचंड गर्दी तरीही वेळेचे व्यवस्थित नियोजन केल्यामुळे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाची मतमोजणी वेळेत झाली.
प्रभाग क्रमांक १८ १९ व २० अशा तीन प्रभागांची मतमोजणी बंडगार्डन जवळच्या मौलाना अबूल कलाम सभागृहात ठेवण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील यांनी बुधवारी रात्रीपासूनच मतमोजणीचे सर्व नियोजन करून ठेवले होते. प्रभाग क्रमांक १८ मध्ये चारही गटांचे मिळून ५१ उमेदवार होते. त्यामुळे या प्रभागाची मतमोजणी सर्वात शेवटी घेण्याचा निर्णय पाटील यांनी घेतला. त्यामुळे सकाळच्या सत्रातच प्रभाग क्रमांक २० व १९ या दोन्ही प्रभागांची मोजणी पूर्ण झाली. त्यानंतर प्रभाग क्रमांक १८ च्या मतमोजणी सुरू झाली. तोपर्यत कर्मचारी सरावले गेल्याने हा प्रभागही वेगात पूर्ण झाला. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुचित्रा पाटील तसेच क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त संध्या गागरे यांनी पाटील यांना सहकार्य केले. १४ टेबल्सवर ४५ कर्मचाऱ्यांनी मतमोजणीचे काम केले.
लोहियानगर, कासेवाडी, खडकमाळ आळी, मोमीन पुरा, महात्मा फुले पेठ, ताडीवाला रस्ता, ससून रुग्णालय असा परिसर या तिन्ही प्रभागात येतो. संवेदनशील म्हणून हा परिसर प्रसिद्ध आहे. अनेक आजीमाजी नगरसेवक रिंगणात असल्यामुुळेही या विभागाची चर्चा होती. त्यातच उमेदवारी अर्ज दाखल करताना राजकीय वाद निर्माण झाले होते. त्यामुळे पाटील यांनी ज्या प्रभागाची मोजणी आहे, त्याच उमेदवार व त्यांच्या मतमोजणी प्रतिनिर्धींना सभागृहात सोडण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्या
प्रभागाची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच पुढच्या प्रभागासाठी आलेल्या उमेदवार व प्रतिनिधींना आत सोडले जात होते. (प्रतिनिधी)
ा्रभाग क्रमांक १८ च्या मतमोजणी दरम्यान काही उमेदवारांच्या प्रतिनिधींनी यंत्रात असलेले मतदान व प्रत्यक्ष झालेले मतदान यात तफावत असल्याने मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणले. त्यावरून वाद निर्माण झाला, मात्र पाटील यांनी यंत्रात असलेली मतदान संख्याच गृहित धरण्यात येईल, लिहिताना कर्मचाऱ्यांकडून काही चूक झाली असेल तर दुरूस्त करण्यात येईल असे सांगितल्यानंतर तणाव निवळला. सायंकाळी ७ वाजता सर्व प्रभागांची मतमोजणी कोणताही गोंधळ न होता पूर्ण झाली व सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.