जनावरांना विकण्याची वेळ
By Admin | Published: June 2, 2016 12:36 AM2016-06-02T00:36:11+5:302016-06-02T00:36:11+5:30
जिवापाड सांभाळ केलेल्या जनावरांना अखेर बाजार दाखविण्याची वेळ आली आहे. उपाशी जनावरांच्या चारा-पाण्याच्या प्रश्नाने शेतकऱ्यांना हैराण केले आहे
काऱ्हाटी : जिवापाड सांभाळ केलेल्या जनावरांना अखेर बाजार दाखविण्याची वेळ आली आहे. उपाशी जनावरांच्या चारा-पाण्याच्या प्रश्नाने शेतकऱ्यांना हैराण केले आहे. दुष्काळी परिस्थितीत जनावरे जगविण्यासाठी आता तरी चारा डेपो सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सध्या, अजूनही दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढतच आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीटंचाई भासत असल्याने शेतकरीवर्ग पावसाच्या प्रतीक्षेत दिसत आहे. परिसरात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांबरोबरच जनावरांनाही मोठ्या प्रमाणात दुष्काळाची झळ बसली आहे. विहिरी, बोअरवेल पाणीसाठा अल्प प्रमाणात असल्याने दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शेतकरीवर्गामध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
बारामती तालुक्याच्या जिरायती भागात भीषण दुष्काळाने शेतकऱ्याचे सगळीक डून आर्थिक नियोजन पूर्ण ढासळले आहे. पिण्यास पाणी नाही. शेती ओस पडली आहे, तर जनावरांना चारा नाही. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. साठवलेला चारा संपला आहे.
चारा विकत घेऊन पाच महिने जनावरांना जगवले. मात्र, आता पैसा जवळ नाही. त्यामुळे शेतकरी जिवापाड सांभाळलेली जनावरे मातीमोल बाजारभावाने बाजारात विकत आहेत.
दरम्यान, एक लाख रुपये किमतीची गाय आज पस्तीस हजार रुपयांनी विकण्याची नामुष्की शेतकऱ्यावर आली असल्याचे फोंडवाडा (लोणी)चे संजय पिसाळ व लालासोा भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)स्वच्छतागृह वापराविना पडून
पिंपळी : गुणवडी येथे ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे स्वच्छतागृह वापराविना पडून आहेत. ग्रामपंचायतीने अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी केलेली आहे; परंतु या ठिकाणी पाण्याची सोय नाही.
शिवाय मैलापाणी जाण्यासाठी तशी उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे अनेक स्वच्छतागृह वापराविना पडून आहेत. अनेक स्वच्छतागृहांचे दरवाजे मोडून पडलेले आहेत. अनेक ठिकाणी दरवाजे नाहीत. या गावामध्ये अनेक कुटुंबांना स्वच्छतागृह बांधण्यासाठी जागा नाही. आर्थिक अडचणींमुळे स्वच्छतागृह नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना उघड्यावर शौचाला जावे लागत आहे. (वार्ताहर)