पशुधन विकण्याची वेळ
By Admin | Published: March 4, 2016 12:34 AM2016-03-04T00:34:22+5:302016-03-04T00:34:22+5:30
दौंड तालुक्याच्या पूर्वभागातील गावांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा विपरित परिणाम या परिसरातील प्रमुख असलेल्या दुग्ध व्यवसायावर होऊ लागला आहे.
राजेगाव : दौंड तालुक्याच्या पूर्वभागातील गावांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा विपरित परिणाम या परिसरातील प्रमुख असलेल्या दुग्ध व्यवसायावर होऊ लागला आहे. चारा उपलब्ध नसल्याने पशुधन विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
दौंड तालुक्यातील पूर्व भागातील राजेगाव, नायगाव, वाटलूज, मलठण, खानवटे या गावांतील शेतकरी शेतीबरोबरच प्रामुख्याने दुग्धव्यवसाय करत आलेला आहे. बहुतांश दुग्धउत्पादक शेतकरी स्वत:च्याच शेतात मका, कडवळ , मेथी घास, हत्ती घास, गिनीगोल ही चारा पिके घेत आलेला आहे. परंतु, गतवर्षी झालेल्या कमी पावसामुळे विहिरी, कूपनलिका व इतर जलस्रोत मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच आटू लागले आहेत. या भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या उजनी धरणातील पाणीपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होत आहे. त्यामुळे चारा पिके धोक्यात आली आहेत.
भीमा नदीच्या पलीकडे असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्रतेने जाणवू लागल्या आहेत. राजेगाव परिसरातून मोठ्या प्रमाणावर मका, कडवळ ही चारा पिके या दुष्काळी भागात विकत घेऊन जात आहेत. पशुधन वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड करताना शेतकरी हतबल झालेला दिसतोय.