प्रदीप कुरुलकरच्या जामीन अर्जावर उत्तर देण्यास सरकारी वकिलांनी मागितला वेळ

By नम्रता फडणीस | Published: August 18, 2023 06:55 PM2023-08-18T18:55:50+5:302023-08-18T18:58:17+5:30

शक्य झाल्यास बचाव पक्षाच्या वकिलांना देखील त्याची प्रत देण्यात यावी असेही आदेशात नमूद केले आहे...

Time sought by government prosecutors to reply to Pradeep Kurulkar's bail application | प्रदीप कुरुलकरच्या जामीन अर्जावर उत्तर देण्यास सरकारी वकिलांनी मागितला वेळ

प्रदीप कुरुलकरच्या जामीन अर्जावर उत्तर देण्यास सरकारी वकिलांनी मागितला वेळ

googlenewsNext

पुणे : संशोधन आणि विकास संस्थेचा (आर अँड डी ई) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याने न्यायालयात जामिनासाठी केलेल्या अर्जावर उत्तर देण्यास  शुक्रवारी सरकारी वकील आणि तपास अधिका-यांनी वेळ मागितला. मात्र त्याला बचाव पक्षाने विरोध दर्शविला. आरोपी मे महिन्यापासून कारागृहात असून, जुलैमध्ये आरोपीविरूद्ध दोषारोपपत्र दाखल झाले आहे. त्यामुळे सरकारी वकिलांना मुदत देणे योग्य होणार नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. त्याची दखल घेत न्यायालयाने सरकारी पक्षाला दि. 25 ऑगस्ट रोजी उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यापूर्वी शक्य झाल्यास बचाव पक्षाच्या वकिलांना देखील त्याची प्रत देण्यात यावी असेही आदेशात नमूद केले आहे.

गेल्या चार महिन्यांपासून कारागृहात असलेल्या डॉ. कुरुलकरने जामिनासाठी केलेल्या अर्जावर विशेष न्यायाधीश व्ही.आर कचरे यांच्या न्यायालयासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान कुरुलकर हा व्हिडिओ कॉंन्फरसिंगद्वारे न्यायालयात हजर झाला. जामीन अर्जावर लेखी जबाब सादर करण्यास सांगितले असतानाही सरकारी वकील आणि एटीएस अधिका-यांनी न्यायालयाकडे वेळ मागितला. मात्र ऍड गानू यांनी या मागणीला विरोध दर्शविला. या प्रकरणात 7 जुलैला दोषारोपपत्र दाखल केले आहे.

एटीएसला याप्रकरणात पुरेपूर वेळ मिळाला असा युक्तिवाद त्यांनी केला. त्यावर एटीएसने मुंबई येथील कार्यालयातून याबबात म्हणणे सादर केल्यानंतर लवकरात लवकर म्हणणे सादर करु असे तपास अधिकारी सुजाता तानवडे यांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान, मागच्या सुनावणीमध्ये कुरुलकरचा जो मोबाइल गुजरातमधील विशेष न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्याची परवानगी देण्याचा अर्ज सरकारी वकिलांनी न्यायालयात केला होता. त्यावर कुरुलकर चे वकील ऍड ॠषीकेश गानू यांनी हा कुरुलकरचाच मोबाइल आहे की नाही याची ओळख पटणे आवश्यक असल्याने आम्हाला मोबाइलचा आयएमइआय नंबर मिळावा असे सांगितले होते. शुक्रवारी सुनावणीदरम्यान सरकारी वकील विजय फरगडे यांनी कुरुलकरच्या जप्त करण्यात आलेल्या मोबाइलचा आयएमइआय नंबर न्यायालयात सादर केला.

एटीएसचे तपास अधिकारी सुनावणीदरम्यान पोहोचले पंधरा ते वीस मिनिटे उशीरा

न्यायालयात सरकारी वकील, बचाव पक्षाचे वकील हजर; मात्र दहशतवाद विरोधी पथकाचा (एटीएस) पत्ताच नसल्याने न्यायाधीशांनी एटीएसला फटकारले. सरकारी वकिलांना उददेशून बोलताना त्यांना वेळेत हजर राहायला सांगा, आम्ही आमच्या सुनावण्या थांबवून तुम्हाला वेळ देतो असा संताप व्यक्त केला. त्यानंतर अधिकारी पंधरा ते वीस मिनिटांनी कोर्टात आले.

पत्नीचा मोबाइल पाठवत नसल्याची कुरुलकरला दिली माहिती

एटीएसने कुरुलकरचे दोन मोबाइल जप्त केले आहेत. त्यातील एक मोबाइल त्याच्या पत्नीचा आहे. तोच मोबाइल गुजरात न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवणार असल्याचा समज कुरुलकरचा झाला होता. मात्र व्हिडिओ कॉन्फरसिंग दरम्यान पत्नीचा मोबाइल पाठवत नसल्याची माहिती त्याला त्यांच्याच वकिलांनी दिली असल्याचे सरकारी वकील विजय फरगडे यांनी सांगितले.

Web Title: Time sought by government prosecutors to reply to Pradeep Kurulkar's bail application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.