घिसाडी समाजावर उपासमारीची वेळ
By Admin | Published: January 11, 2017 02:00 AM2017-01-11T02:00:05+5:302017-01-11T02:00:05+5:30
वितभर पोटासाठी लोखंडाशी झुंज देत राजस्थानातील घिसाडी समाज वालचंदनगरला दाखल झालेला आहे. वितभर पोटासाठी या समाजातील महिला व अल्पवयीन मुले
वालचंदनगर : वितभर पोटासाठी लोखंडाशी झुंज देत राजस्थानातील घिसाडी समाज वालचंदनगरला दाखल झालेला आहे. वितभर पोटासाठी या समाजातील महिला व अल्पवयीन मुले लोखंडाशी झुंज देताना दिसत आहेत. हा समाज वर्षानुवर्षे परराज्यांत भटकंती करून आपली उपजीविका भागवत असतानाच शासनाच्या नोटाबंदीच्या विळख्यात सापडल्याने कुटुंबांवर उपासमारीची वेळ
आलेली आहे.
वालचंदनगर येथील गार्डन चौकात राजस्थानी घिसाडी समाज पोटाची खळगी भरण्यासाठी कोसों दूर येऊनही नोटाबंदीमुळे पोट भरणे कठीण झाले आहे. लोखंडापासून विविध शेतीउपयोगी वस्तू बनवूनही शेतकऱ्याकडे वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने या घिसाडी समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे. परिसरात दारोदार फिरून लोखंडाच्या तयार केलेल्या वस्तू अल्प किमतीत देऊन पोटाला पीळ देत जगण्याची वेळ या समाजावर आलेली आहे. बाजारात रेडीमेड शेती उपयोगी वस्तू सहजासहजी मिळत असल्याने या समाजाकडे शेतकऱ्याने पाठ फिरवली आहे. त्यामुळे दर वर्षी कोसों दुरून येणाऱ्या या समाजावर या वर्षी नोटाबंदी व बाजारातील रेडीमेड मिळणाऱ्या वस्तूंमुळे पोटासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.