नायलॉन मांजाला ढील दिल्याने आयुष्याचाच पतंग कटण्याची वेळ! दुचाकीस्वाराचा चिरला गळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 11:55 IST2024-12-31T11:55:22+5:302024-12-31T11:55:46+5:30

पोलिसांनी बाजारपेठेत जाऊन संबंधित मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे

Time to cut the kite of life due to relaxation of nylon rope! Biker's throat slit | नायलॉन मांजाला ढील दिल्याने आयुष्याचाच पतंग कटण्याची वेळ! दुचाकीस्वाराचा चिरला गळा

नायलॉन मांजाला ढील दिल्याने आयुष्याचाच पतंग कटण्याची वेळ! दुचाकीस्वाराचा चिरला गळा

श्रीकिशन काळे 

पुणे : नायलॉन किंवा चिनी मांजावर बंदी असताना शहरामध्ये सर्रास त्याची विक्री केली जात आहे. त्यामुळे लहान मुले त्याचा वापर करतात आणि तुटलेला मांजा अनेक ठिकाणी अडकून त्याने पक्षी जखमी होत आहेत. काही वेळा दुचाकीस्वाराच्या समोर हा मांजा आल्याने त्याने गळा चिरला जात आहे. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला, तर अनेकजण जखमी होत आहेत. पोलिसांनी बाजारपेठेत जाऊन संबंधित मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

सध्या शहरामध्ये पतंग उडविण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. परंतु, पूर्वीसारखा साधा दोरा न वापरता नायलॉनचा मांजा पतंग उडविण्यासाठी वापरला जातो. त्याने अनेकजण जखमी होत असून, पक्षीही त्यात अडकत आहेत. पक्षी, प्राण्यांसह मनुष्याच्या जीवाला धोकादायक ठरणाऱ्या चिनी, प्लास्टिक आणि नायलॉन माजांच्या विक्रीला राज्य सरकारने २०१७ मध्येच बंदी घातली. पण तरीही अशा जीवघेण्या मांजाची छुपी विक्री, वापर आणि साठवणूक होत आहे. ही बंदी झुगारून नायलॉन मांजाचा वापर होत असून, संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

संक्रांत जवळ येऊ लागताच पुणेच्या आकाशात वेगवेगळ्या रंगाचे पतंग दिसत आहेत. परंतु ही पतंगबाजी करताना नायलॉन मांजाचा वापर केल्याने अनेकांचा जीव धोक्यात जात आहे. या धोकादायक मांजामुळे या कालावधीत अनेक पक्षी, प्राणी जखमी होतात, तर काही मृत्युमुखी पडतात. हे कापलेले धागे पतंगांसोबत जमिनीवरच पडून राहतात. ते विघटनशील नसल्याने मातीमध्ये तसेच मिसळतात. त्यामुळे गटारे तुंबणे, ड्रेनेज लाइन तुंबणे, नद्या, नाले यांसारखे नैसर्गिक पाण्याचे प्रवाह अडणे असे प्रकार अनुभवायला येतात.

राज्य सरकारने १९८६च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम ५ नुसार या मांजाची विक्री व वापरावर बंदी घातली आहे. तरीही या मांजाची विक्री आणि वापर सर्रास होत असल्याचे पहायला मिळते.

...तर होईल गुन्हा दाखल !

नायलॉन किंवा चिनी मांजा वापरताना अगर विक्री करताना कुणी आढळल्यास बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल होईल. हा जामीनपात्र गुन्हा असला, तरी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे एक महिना कारावास किंवा दंड तसेच दोन्ही शिक्षा होऊ शकतात. या मांजामुळे कुणी जखमी झाल्यास भादंविच्या इतर कलमांनुसारही कारवाई केली जाऊ शकते.

या पतंगबाजीच्या काळातच खूप तक्रारी येत आहेत. दररोज साधारणपणे १० तक्रारी आहेत आणि महिनाभरात १०० हून अधिक घटना घडल्या आहेत. मुलांनी नायलॉन चिनी मांजा वापरू नये, तरच या घटना थांबतील. -सायली पिलाने, रेस्क्यू टीम मेंबर

मी रामटेकडीच्या पुलावरून जात असताना अचानक समोरून मांजा आला आणि माझा गळा चिरला गेला. मी गाडीला ब्रेक लावला आणि खाली पडलो. नायलॉन मांजामुळे माझा गळा चिरला गेला. डॉक्टरांनी उपचार केले. थोडक्यात मी वाचलो, अन्यथा माझी नस कापली गेली असती आणि जीव गेला असता. नायलॉन मांजावर बंदी असताना विक्री केली जाते, याविरोधात सातत्याने कारवाई व्हायला हवी. तरच हा प्रकार बंद होईल. - भैरव भाटी, मांजामुळे जखमी झालेले दुचाकीस्वार

घुबडाचा वाचला जीव!

भांबुर्डा वन विभागात एक घुबड मांजामुळे झाडावर अडकले होते. अग्निशमन दलाचे नीलेश महाजन यांनी आणि त्यांच्या सहकार्यामुळे त्या घुबडाला जीवदान देण्यात आले. मुलांनी नायलॉन मांजाचा वापर करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

अग्निशमन दलाची आकडेवारी 

पक्षी/प्राण्याची सुटका

२०२० : ९४०
२०२१ : ७५३

२०२२ : ८९५
२०२३ : ८८७

२०२४ : ५२८

Web Title: Time to cut the kite of life due to relaxation of nylon rope! Biker's throat slit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.