धरणातला गाळ ठरतोय पाण्यासाठी काळ
By admin | Published: February 3, 2016 01:41 AM2016-02-03T01:41:13+5:302016-02-03T01:41:13+5:30
कित्येक दशकांपासून पुणे जिल्ह्यातील धरणांमधील गाळ काढलेला नसल्याने धरणांच्या साठवण क्षमतेत मोठी घट झाली आहे
पुणे : कित्येक दशकांपासून पुणे जिल्ह्यातील धरणांमधील गाळ काढलेला नसल्याने धरणांच्या साठवण क्षमतेत मोठी घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईने अनेक गावे तहानलेली असताना धरणांतील गाळच पाण्यासाठी काळ ठरत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
जलसंधारणासाठी एकीकडे राज्यशासनातर्फे जलयुक्त शिवारसारख्या योजना राबविल्या जात आहेत. मात्र, पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या जिल्ह्यातील धरणातील गाळ गेल्या कित्येक दशकांपासून काढला गेलेला नाही.
पुणे जिल्ह्यात जवळपास २५ धरणे आहेत. या धरणांमुळे मोठे क्षेत्र सिंचनाखाली आलेले आहे. जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पातील धरणे अहमदनगर जिल्ह्यासाठी, तर उजनी धरणामुळे सोलापूर जिल्ह्याचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, गेल्या काही दशकांत या धरणात गाळ साचल्याने साठवणक्षमतेवर परिणाम झाला आहे. राज्य शासन एकीकडे जलसंधारणासाठी अनेक मोहिमा तसेच योजना राबवीत आहेत. सध्या जलयुक्त शिवार योजना मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात राबविली गेली आहे. यामुळे भूजलपातळीत वाढ झाली आहे. मात्र पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या धरणातील गाळ काढण्यासाठी कुठलीही यंत्रणा नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळलेले आहे.
भोर तालुक्यातील भाटघर धरणाची पाणी साठवण्याची क्षमता २३ टीमसी आहे. या धरणात जवळपास १० ते १२ टक्के गाळ साठल्याने दोन टीमसी पाणी धरणात कमी साठत असल्याची माहिती पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. नीरा देवघर धरणाची साठवण क्षमता गाळामुळे जवळपास दोन ते चार टक्क्यांनी घटली आहे. शिरूर तालुक्यातील घोड धरणाचीही हीच अवस्था आहे. पुरंदर तालुक्यातील वीर धरणात जवळपास १ टीएमसी गाळ साठला आहे. हा गाळ काढला गेल्यास पुरंदर तालुक्याच्या दुष्काळी भागाला पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.
उजनी धरणात ३४ वर्षांपासून १४.९६ टीएमसी गाळ साठला आहे. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे २०११-१२च्या सुमारास उजनीतील गाळ काढण्याच्या प्रक्रियेस मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ‘मेरी’ या नाशिक येथील संस्थेने सन २००२ मधे धरणातील गाळाचा अभ्यास केला. त्या काळात त्या संस्थेच्या अहवालानुसार धरणात ८.५८ टीएमसी गाळ साठल्याचे निदर्शनास आले होते. नोव्हेंबर २०११ मध्ये नवी दिल्ली येथील केंद्रीय जल आयोगाने ‘टुजो विकास’ या संस्थेच्या माध्यमातून, जीपीएस पद्धतीने गाळाचे फेरसर्वेक्षण केले. त्याचा अंतिम अहवाल मार्च २०१२ ला शासनास सादर केला, त्या वेळी धरणात १४.९६ गाळ साठल्याची माहिती पुढे आली.
असा मोजतात गाळ
याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गाळ घनमीटर पद्धतीमध्ये मोजला जातो. धरणातील गाळाचे सर्वेक्षण करण्यासाठी होडीच्या साहाय्याने एका विशिष्ट मापकाचा वापर करून ते पाण्यात सोडले जाते. त्यानुसार गाळाची मोजणी केली जाते. त्यामुळे पाणीसाठ्याची क्षमता कमी झाली आहे. याशिवाय पाणीसाठा कमी झाला, तर गाळ लांबी-रुंदीमध्ये देखील मोजला जातो. धरण बांधल्यानंतर ५० ते १०० वर्षांच्या कालावधीनंतर धरणांमधील गाळ काढता येतो. तोपर्यंत गाळ काढता येत नाही. आणखी बातम्या पान ८