अंडाशयाच्या कर्करोगाचे वेळेत निदान आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:17 AM2021-09-10T04:17:29+5:302021-09-10T04:17:29+5:30
स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला : पस्तिशीनंतर नियमितपणे कराव्या चाचण्या पुणे : अंडाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जनजागृतीचा अभाव, उशिराने ...
स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला : पस्तिशीनंतर नियमितपणे कराव्या चाचण्या
पुणे : अंडाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जनजागृतीचा अभाव, उशिराने होणारे निदान आणि उपचारांमुळे हे प्रमाण वेगाने वाढत आहे. कर्करोगाचे लवकर निदान होण्याच्या दृष्टीने पस्तिशीनंतर महिलांनी सीए-१२५ रक्त चाचणी आणि ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंड करुन घ्यावे, तसेच ओटीपोटात दुखणे, सूज येणे किंवा वारंवार लघवी होणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे टाळावे, असा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञांकडून दिला जात आहे.
अंडाशयाचा कर्करोग हा भारतीय महिलांमध्ये तिसरा सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे. सामान्यतः ५५-६४ वयोगटात हा कर्करोग दिसून येतो. भारतात सर्व कर्करोगाच्या मृत्यूंपैकी ३.३४% मृत्यू हे अंडाशयाच्या कर्करोगामुळे होतात. अंडाशयाचा कर्करोग म्हणजे घातक ट्यूमर, किंवा स्त्रीचे अंडाशय, आणि ओटीपोटाच्या अवयवांमध्ये आणि एखाद्याच्या उदर आणि फुप्फुसात देखील पसरतो. गर्भधारणा न होणे, कमी वयात मासिक पाळी सुरू होणे, उशिरा होणारी रजोनिवृत्ती, पहिल्या गर्भधारणेचे उशिरा वय ३५ वर्षांपेक्षा जास्त असणे, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, तंबाखू, धूम्रपान आणि कौटुंबिक इतिहास आदी घटक कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात.
अंडाशयाच्या कर्करोगाचा उपचार हा कर्करोगाचा टप्पा, ट्यूमरचा आकार आणि स्थानावर अवलंबून असेल आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये तो भिन्न असू शकतो. अंडाशयाचा कर्करोग टाळण्यासाठी, दररोज व्यायाम करा, संतुलित आहार घ्या, धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन टाळा आणि स्तनदा मातांनी बाळाला स्तनपान करा, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
----
बहुतांश वेळा अंडाशयाच्या कर्करोगाचे निदान तिसऱ्या, चौथ्या किंवा शेवटच्या टप्प्यात होते. सुरूवातीच्या टप्प्यातील केवळ १५ टक्के प्रकरणांचे निदान होते. निदानास उशीर झाल्यास उपचार करणे अवघड होते. अंडाशयाच्या कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास रुग्णाचा जीव वाचवणे शक्य होते.
- डॉ. दीप्ती कुर्मी, स्त्रीरोगतज्ज्ञ
------
अंडाशयाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी निश्चित तपासणी तंत्र नाही. ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंड आणि सीए १२५ रक्त चाचणी या तपासणीद्वारे कर्करोगाचे निदान करता येते. ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंडमधील ध्वनी लहरींच्या साहाय्याने गर्भाशय, फॅलोपियन ट्यूब आणि अंडाशयाची तपासणी होते. अचानक वजन कमी होणे, थकवा येणे आणि आतड्यांच्या कार्यात अडथळा निर्माण होणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने रक्त चाचण्या करून घ्याव्यात.
- डॉ. कीर्ती प्रकाश कोटला, पॅथॉलॉजिस्ट