तिमिराला छेदून प्रकाश पेरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 01:48 AM2018-10-17T01:48:53+5:302018-10-17T01:49:08+5:30
अंधांना मिळाले लेखनिक; सोशल मीडियाचा उपयोग
पुणे : परीक्षा देऊन रेल्वेमध्ये अधिकारी व्हायचे म्हणून अंध विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अर्ज भरला होता. अधिकारी व्हायचे स्वप्न त्यांना पेपरमध्ये चांगले गुण मिळवून पूर्ण होणार होते. परंतु, पेपर लिहिण्यासाठी त्यांच्याकडे लेखनिक नव्हता; पण सोशल मीडियाच्या मदतीने सर्वांना लेखनिक मिळाले आणि तिमिराला छेद देऊन ‘डोळस’ माणसांनी त्यांचे पेपर लिहिण्यासाठी पुढाकार घेतला.
जन्मजात डोळ््यांत दृष्टी नसल्याने ‘त्यांना’ इतरांवर अवलंबून राहावे लागते. नुकत्याच झालेल्या रेल्वे परीक्षेसाठी सोशल मीडियावर काही जणांनी पोस्ट टाकल्या, की ‘लेखनिक हवा’. त्यानंतर अनेकांनी संपर्क साधला आणि जवळपास बाहेरगावाहून आलेल्या २४ जणांना लेखनिक मिळाले. या कामी मानवी हक्कासाठी लढणारी कार्यकर्ती अॅड. विंदा महाजन यांनी पुढाकार घेतला. त्यांनीच सोशल मीडियाच्या मदतीने सर्वांना लेखनिक मिळवून दिले.
अंध व्यक्तीला लेखनिक म्हणून काम करण्याचा पहिलाच अनुभव होता. सुरुवातीला मला उशीर झाला आणि जाता आले नाही. परंतु, मित्राचा फोन आला आणि माझ्या परिसरातील एका अंध विद्यार्थ्याला लेखनिकाची गरज असल्याचे समजले. मी लगेच गेलो आणि परीक्षा दिली. शेवटी वाढदिवसाच्या दिवशी खूप चांगलं असं काहीतरी केल्याच्या खुशीत खूप गोड झोप लागली, अशा भावना विद्यार्थी महेश मगर याने व्यक्त केल्या. चैैतन्य पवार, नीलेश पवार, गणेश पांढरे, केवल बोधे, प्रशांत कुंभार, दीपक अयूश, गोपाळ नारायण, चैैताली पिसे, श्रद्धा पवार, गोरख उत्कर्ष, अभिनव पाटील, आकाश कोष्टी, प्रथमेश पवार, अमित पवार, महेश मगरे, स्नेहल ताकवडे, संकेत निकम, मयूरी तिळवणे, शिवानी काळे, शौर्य एकनाथ, सौरभ डोंगरे, अमोल खेडकर आदींनी अंधांसाठी पेपर लिहिला. प्रा. राज देशमुख यांनी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणले.