Guillain Barre Syndrome: हातापायाला मुंग्या, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास, 'गुइलेन बॅरे सिंड्रोम', नका करू दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 11:44 IST2025-01-22T11:43:51+5:302025-01-22T11:44:37+5:30
आजाराचे उपचार अत्यंत खर्चिक असून, नागरिकांना न परवडणारे आहेत, त्यामुळे आजार गंभीर हाेण्याची वाट न पाहता त्वरित डॉक्टरांना दाखवा

Guillain Barre Syndrome: हातापायाला मुंग्या, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास, 'गुइलेन बॅरे सिंड्रोम', नका करू दुर्लक्ष
पुणे : पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याचा ग्रामीण भागात गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे २४ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यात पुणे महापालिका हद्दीत ५, पिंपरी चिंचवड महापालिकेत २, ग्रामीण भागामध्ये १६ आणि पुणे जिल्हा बाहेरील १ संशयित रुग्णांचा समावेश आहे. २४ पैकी दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत; तर ८ रुग्ण अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेत आहेत. या आजाराचे गांभीर्य विचारात घेऊन याचे विश्लेषण करण्यासाठी नऊ जणांची समिती (शीघ्र कृतिदल) नेमली आहे. यात एनआयव्ही, राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी, स्वयंसेवी संस्था याचा समावेश आहे.
‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ या आजारामध्ये बाधित रुग्णाची प्रतिकारशक्ती मज्जातंतूवर आघात करते. या आजाराची लागण सर्वसाधारण वयोगटातील व्यक्तींना होते. यामध्ये हातापायाची ताकद कमी होणे, हातापायाला मुंग्या येणे, गिळण्यास आणि बोलण्यास त्रास होणे, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही साधारणपणे या आजाराची लक्षणे आहेत. या आजाराचे ५ संशयित रुग्ण पुणे महापालिका हद्दीत आढळले आहेत. पाचपैकी दोन सिंहगड रस्ता, उर्वरित बावधन आणि विश्रांतवाडी भागातील आहेत. २४ संशयित रुग्णांपैकी काशीबाई नवले हॉस्पिटल येथे १ आणि भारती हॉस्पिटल १ असे दोन रुग्ण व्हेंटिलेटर आहेत. आठ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
सदर समितीच्या स्थापनेचे आदेश आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर यांनी काढले आहेत. त्यानुसार यामध्ये ‘एनआयव्ही’चे शास्त्रज्ञ डॉ. बाळासाहेब तांदळे, डॉ. प्रेमाचंद कांबळे, डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. नागनाथ रेडेवार, डॉ. राजू सुळे, डॉ. अभय तिडके, डॉ. भालचंद्र प्रधान, डॉ. मीना बोराडे, डॉ. अमोल मानकर यांचा समावेश आहे.
त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ हा एक दुर्मीळ न्यूरोलॉजिकल आजार असून, पुण्यातील ठराविक ठिकाणी याचे रुग्ण आढळून आले आहेत. त्या ठिकाणी व्हायरस किंवा बॅक्टेरिया असल्याची शक्यता आहे. स्थितीमुळे अशक्तपणा, सुन्नपणा आणि गंभीर प्रकरणांमध्ये पक्षाघात होऊ शकतो. गुइलेन बॅरे सिंड्रोम कोणालाही प्रभावित करू शकतो. यामध्ये अनेकांना श्वास घेण्यास किंवा खोकला सर्दी होते. त्यातून १५ दिवसांनी रुग्णांना हातापायाला मुंग्या येणे किंवा चालायला त्रास होणे, अशाही समस्या जाणवतात. त्यामुळे त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. - डॉ. नीलेश पळसदेवकर, न्यूरॉलॉजिस्ट
आजाराचे उपचार अत्यंत खर्चिक
गुइलेन बॅरे सिंड्रोममध्ये पहिल्यांदा रुग्णांना हातापायाला मुंग्या येणे, चालायला त्रास होणे किंवा श्वास घ्यायला त्रास होणे अशा समस्या दिसून येतात. यात संसर्गजन्य आजारदेखील असू शकतात किंवा क्लैमाइडिया संसर्गदेखील होऊ शकतो. फक्त हा दुर्मीळ आजार संसर्गजन्य आहे की बॅक्टेरियामुळे झालेला हे शोधणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे या आजाराचे उपचार अत्यंत खर्चिक असून, नागरिकांना न परवडणारे आहेत. त्यामुळे आजार गंभीर हाेण्याची वाट न पाहता नागरिकांनी हातापायातील ताकद कमी होत असेल तर त्वरित डॉक्टरांना दाखवून त्यावर उपचार घेणे महत्त्वाचे आहे. - डॉ. सचिन यादव, जनरल फिजिशियन
महापालिकेने सुरू केले सर्वेक्षण
पुणे महापालिका हद्दीत ज्या भागात रुग्ण आढळले, त्या भागाचे सर्वेक्षण पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केले आहे. यात प्रत्येक केसचे डिटेल्स घेतले जात आहे. त्याने काही प्रवास केला आहे का, याची माहिती घेतली जाणार आहे. गुइलेन बॅरे सिंड्रोम आजार कशामुळे झाला, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. हा आजार होण्यासाठी एक विशिष्ट कारण कारणीभूत नाही. त्यामुळे आठ संशयित रुग्णांची रक्त आणि लघवी नमुना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पाण्याचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आणि आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली.
समितीची आज बैठक
गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराच्या विश्लेषणासाठी महापालिकेने समिती स्थापन केली आहे. या समितीची तातडीची बैठक बुधवारी (दि. २२) होणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली.
पाणी उकळून प्या, बाहेरचे खाणे टाळा!
आपल्याकडे सध्या ‘जीबीएस’ रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे यातील संशयित सर्व रुग्ण सिंहगड रोड आणि आसपासचे आहेत. हे रुग्ण लूज मोशन व तापाने त्रस्त आहेत. या आजाराने रुग्ण बाधित हाेताे तेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूवर हल्ला करते. गुइलेन-बॅरे सिंड्रोम ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये अशक्तपणा, सुन्नपणा किंवा अर्धांगवायू होऊ शकतो. गुइलेन-बॅरे सिंड्रोम ही वैद्यकीय आणीबाणी आहे. या स्थितीतील बहुतेक लोकांना रुग्णालयात उपचारांची आवश्यकता असते. यापासून खबरदारी म्हणून नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, बाहेरचे खाऊ नये.