‘बडी कॉप’च्या वापराने टिंगलखोर गजाआड
By admin | Published: April 23, 2017 04:23 AM2017-04-23T04:23:53+5:302017-04-23T04:23:53+5:30
आयटी कंपन्यांमधील महिलांसाठी पुणे पोलिसांनी निर्माण केलेल्या ’बडी कॉप ’ संकल्पनेचा वापर करुन चंदननगर येथील एका कॉलसेंटरमधील मुलीने एका टिंगलखोराची तक्रार केली.
पुणे : आयटी कंपन्यांमधील महिलांसाठी पुणे पोलिसांनी निर्माण केलेल्या ’बडी कॉप ’ संकल्पनेचा वापर करुन चंदननगर येथील एका कॉलसेंटरमधील मुलीने एका टिंगलखोराची तक्रार केली. त्याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली.
किशोर रामदास औटी (वय ३०,विशालदिप सोसायटी, हनुमान मंदिराजवळ, चंदननगर)असे आरोपीचे नाव आहे. २१ तारखेला हा प्रकार घडला. चंदननगर बडीकॉप व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोलीस मदत हवी असल्याबद्दल कॉलसेंटरमधील मुलीने मेसेज केला. फौजदार संदिप साळुंके व कर्मचा-यांनी त्या मुलीस फोन केला. विचारपूस करुन मदतीसाठी धाव घेतली.
त्यावेळी औटी हावभाव, खाणाखुणा करुन तू खूप छान दिसतेस असे म्हणत असल्याचे सांगितले.औटी ही मुलगी काम करत असलेल्या कॉल सेंटरमध्येच सेवेस आहे. या मुलीने त्याच्या आक्षेपार्ह वर्तनाविषयी तक्रार केली होती, कंपनी प्रशासनाने त्याला सक्त ताकीद दिली होती. बडीकॉपच्या वापरामुळे औटी अखेर गजाआड गेला.त्याच्यावर कलम ५०९ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
रश्मी शुक्ला,सायबय गुन्हे शाखेचे उपायुक्त दिपक साकोरे,तांत्रिक पथकाचे पंकज घोडे, प्रणित कुमार आदींनी आयटी कंपन्यांमधील महिलांना मार्गदर्शन केले होते.
- पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी बडीकॉप संकल्पना सुरु केली आहे. सध्या हडपसर, चंदननगर, हिंजवडी आणि येरवडा या आयटी कंपन्या आणि कॉलसेंटर मोठ्या संख्येने असलेल्या भागात पोलीस अधिकारी आणि या कंपन्यांमधील महिला यांचे व्हॉट्सअॅप ग्रुप बनविण्यात आले आहेत. एका ग्रुपमध्ये ५० महिला कर्मचारी,वरिष्ठ पोलीस निरिक्षक,फौजदार आणि एक कर्मचारी यांचा समावेश आहे.