हातपाय गमावलेले टिंकेश बनला व्यायाम प्रशिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:10 AM2020-12-06T04:10:11+5:302020-12-06T04:10:11+5:30
पुणे : शारीरिक अपंगत्वावर मात करत टिंकेश कौशिक यांनी अनेक विक्रम नोंदवले आहेत. टिंकेशने आपल्या मेंटरच्या पाठिंब्याने उंड्री पिसोळी ...
पुणे : शारीरिक अपंगत्वावर मात करत टिंकेश कौशिक यांनी अनेक विक्रम नोंदवले आहेत. टिंकेशने आपल्या मेंटरच्या पाठिंब्याने उंड्री पिसोळी रोड येथे व्यायामशाळा सुरू केली आहे. ते लोकांना शारीरिक तंदुरुस्ती आणि पोषक आहाराचे महत्त्व समजावून सांगतात. संकटाला संधी मानत स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवला तर काहीही अशक्य नाही, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
टिंकेश मूळचे हरियाणाचे. ते ९ वर्षांचे असताना एका दुर्घटनेमुळे त्यांना गुडघ्याखालचे दोन्ही पाय व डावा खांदा गमावला. वयाच्या ११ व्या वर्षीत्यांना कृत्रिम पाय बसवण्यात आला. कुटुंबाच्या पाठिंब्याने त्यांनी २०१५ मध्ये पदवी पूर्ण केली. तथापी, कृत्रिम पायांच्या हालचालींच्या मर्यादेमुळे त्यांचे वजन वाढू लागले. या काळात त्यांनी अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. दोन वर्षांच्या कालावधीत व्यायाम आणि खेळातून १०-१५ किलो वजन कमी केले.
टिंकेश २०१८ मध्ये पुण्यात आले आणि स्मिता गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन अँडफिटनेस सायन्सेस’कडून ‘फिटनेस अँड न्यूट्रिशन कन्सल्टंट’ म्हणून प्रमाणपत्र मिळवले. सध्या ते प्रशिक्षित योग शिक्षक आणि वेलनेस कोच म्हणून काम करत आहेत. अपंग लोकांच्या तंदुरुस्तीसाठी ते सध्या कार्यरत आहेत. काही रुग्णालयात ते स्वयंसेवक म्हणूनही ते काम करतात.
२५ नोव्हेंबर २०१८ रोजी नेपाळच्या काठमांडू येथे टिंकेश कौशिकने एक नवा विक्रम स्थापित केला. ‘द लास्ट रिसॉर्ट’मध्ये स्विंग बन्जी जम्प ने १६० मीटर उंचीवरून उडी मारण्याचा विक्रम केला. ते जगातील सर्वात जास्त उंचीचे कॅनियन स्विंग साइट आहे. या पराक्रमासाठी त्यांचे नाव २०२० च्या लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.
चौक
“हातपाय गमावल्यानंतर सुरुवातीला मला खूप नैराश्य आले होते. मात्र, मी संकटाकडे संधी म्हणून पहायचे ठरवले. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मी एक धावपटू, जलतरणपटू, पॅरा सायकलपटू, मॅरेथॉनपटू आणि फिटनेसप्रेमी बनलो. अपंगत्वाने मला खऱ्या अर्थाने क्षमतांकडे पाहण्यासाठी माझे डोळे उघडले. मानसिकदृष्टया सक्षम नसाल तर काहीही अशक्य नाही, हे समजले.”
-टिंकेश कौशिक