पाच हजार ढोलांवर पडणार टिपरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 04:56 AM2017-08-06T04:56:55+5:302017-08-06T04:56:58+5:30
गणेशोत्सवासाठी महापालिका करणार असलेल्या ढोलवादनाच्या जागतिक विक्रमासाठी गिनीज बुकच्या प्रतिनिधींकडे अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर
पुणे : गणेशोत्सवासाठी महापालिका करणार असलेल्या ढोलवादनाच्या जागतिक विक्रमासाठी गिनीज बुकच्या प्रतिनिधींकडे अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर २२ आॅगस्टला दुपारी ५ हजार वादक ढोलावर टिपरी टाकून परिसरातील गणेशाचे पुण्यात दणदणीत स्वागत करतील. महापौर मुक्ता टिळक यांनी ही माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी स्वत: गणेशमूर्ती तयार करण्याचाही उपक्रम घेण्यात येणार आहे. तोही विक्रमच असेल. यापूर्वी २ हजार जणांनी मूर्ती तयार करण्याचा विक्रम आहे. महापालिका सुमारे २ हजार ५०० विद्यार्थी मूर्ती तयार करतील, असे नियोजन महापालिका करत आहे. त्यासाठी शाळांशी संपर्क साधण्यात येत आहे. मूर्ती तयार होऊन ती वाळण्यासाठी व रंग देण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने हा उपक्रम लवकर घेण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी शाळांचे परीक्षेचे वेळापत्रक लक्षात घेऊन नियोजन करण्यात येत आहे, असे महापौर म्हणाल्या.
सदिच्छादूतासाठी सचिन तेंडुलकरसह आणखी काही वलयांकित व्यक्तींचे प्रयत्न सुरू आहेत, लवकरच याबाबत घोषणा करण्यात येईल. शहरात या काळात १२५ नामवंत कलाकार निमंत्रित करण्यात येणार आहेत. त्याशिवाय अन्य अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. त्याचे नियोजन
सुरू असल्याची माहिती
महापौरांनी दिली.
सार्वजनिक गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव म्हणून महापालिकेने यावर्षी विविध उपक्रम आयोजित केले आहेत. ढोलवादनाचा जागितक विक्रम हा त्याचाच एक भाग आहे. अशा उपक्रमांची गिनीज बुकच्या प्रतिनिधींकडे उपक्रमाच्या किमान २२ दिवस आधी नोंदणी करावी लागते. ही नोंदणी झाली असल्याचे महापौरांनी सांगितले. शहरातील विविध पथकांशी यासाठी संपर्क साधण्यात आला आहे. त्यांची पथके तसेच त्याशिवाय अन्य युवक असे एकूण ५ हजार जण त्यादिवशी ढोलवादन करतील. स. प. महाविद्यालयाकडे मैदानाची मागणी करण्यात आली असल्याचे महापौरांनी सांगितले.