टिपु सुलतानचे स्मारक पुण्यात होऊ देणार नाही; भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटेंचा इशारा
By राजू हिंगे | Published: May 6, 2024 08:18 PM2024-05-06T20:18:48+5:302024-05-06T20:19:09+5:30
जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आणि मताचे धुव्रीकरण करण्यासाठी असे विधान केले जात असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली...
पुणे : पुण्यात टिपु सुलतानचे स्मारक करण्याची घोषणा एमआयएमचे पुणे लोकसभेचे उमेदवार अनिस सुंडके यांनी केली असून त्यांचा भाजपने निषेध केला आहे. टिपू सुलतानचे स्मारक पुण्यात होऊ देणार नाही. जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आणि मताचे धुव्रीकरण करण्यासाठी असे विधान केले जात असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.
यावेळी भाजपचे लोकसभेचे प्रभारी श्रीनाथ भीमाले, संदीप खर्डकर, पतित पावनचे सत्यजित नाईक आदी उपस्थित होते. एमआयएमने केलेल्या या विधानाचा निषेध आहे. या विधानाबाबत पोलिस, निवडणुक आयोगाकडे तक्रार केली जाणार आहे. या बाबत सर्व कायदेशीर पाऊले उचलली जातील. पुणे लोकसभा मतदारसंघात भाजप विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे, असेही धीरज घाटे यांनी सांगितले.