Independence Day| आळंदीत माऊलींच्या संजीवन समाधीला 'तिरंगा' सजावट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 08:08 PM2022-08-15T20:08:19+5:302022-08-15T20:09:27+5:30
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात विविध रंगबिरंगी फुलांची आकर्षक सजावट ...
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात विविध रंगबिरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विशेषतः म्हणजे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात फुलांमधून देशाचा ''तिरंगा'' साकारण्यात आला आहे. तत्पूर्वी, पहाटे समाधीवर घंटानाद, दुधारती व महापूजा करण्यात आली.
यंदा स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा' अभियान अंतर्गत घरोघरी तिरंगा लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला तीर्थक्षेत्र आळंदीत उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून बहुतांश घरांवर तिरंगा फडकविण्यात आला आहे. तर नगरपरिषद कार्यालयावर विद्युत रोषणाईतून 'तिरंगा' साकारण्यात आला आहे.
श्री. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातही स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त ऍड. विकास ढगे - पाटील, विश्वस्त अभय टिळक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दरम्यान स्वातंत्र्य दिनाची सुट्टी आणि राष्ट्रीय सणाची पर्वणी साधत हजारो भाविकांनी माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतल्याची माहिती व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.