मिळकत कराचे उद्दिष्ट पूर्ण करताना प्रशासनाची नाकीनऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 08:44 PM2019-03-12T20:44:03+5:302019-03-12T20:50:22+5:30
शहरामध्ये सुमारे ९ लाख नोंदणीकृत मिळकती आहे. यामुळेच महापालिकेला सन २०१८-१९ या वर्षांसाठी सुमारे १ हजार ८१० कोटी रुपयांचा मिळकत कर वसुल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे...
पुणे: महापालिकेला चालु आर्थिक वर्षांत मिळकत कर वसुलीसाठी अखेरचे पंधरा दिवसच शिल्लक राहिले आहे. परंतु यंदा मिळकतीचे १ हजार ८१० कोटींचे उद्दीष्ट पूर्ण करताना प्रशासनाच्या नाकीनऊ आले असून, आता पर्यंत केवळ आकराशे कोटी जमा झाले आहेत. अखेरच्या पंधरा दिवसांत आणखी शंभर ते दीडशे कोटी रुपये जमा होतील असा अंदाज आहे. त्यामुळे यंदा उद्दीष्टाच्या केवळ ७० ते ७५ टक्केच उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरामध्ये सुमारे ९ लाख नोंदणीकृत मिळकती आहे. यामुळेच महापालिकेला सन २०१८-१९ या वर्षांसाठी सुमारे १ हजार ८१० कोटी रुपयांचा मिळकत कर वसुल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये आता पर्यंत सुमारे आकराशे कोटी रुपयांचा मिळकतकर जमा झाला आहे. आठराशे कोटींचे असले तरी प्रशासनाला सुमारे पंधारे कोटी रुपये मिळकत करा मधून मिळतील असा अंदाज होता. परंतु आता बाराशे कोटींचा टप्पा पार करताना मिळकत कर विभागाची दमछाक झाली आहे. गत वर्षी महापालिकेला मिळकत करातून १ हजार ८४ कोटी रुपये मिळाले होते. मिळकत कर वसुलीसाठी प्रशासनाकडे आता शेवटचे पंधरा दिवस शिल्लक असून, आणखी शंभर ते दीडशे कोटी जमा होतील असे, मिळकत कर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले.
-------------------
वर्षभरामध्ये ७०० व्यावसायिक मिळकती सील
महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या वतीने मिळकत कराची थकबाकी वसुल करण्यासाठी अनेक मोहिम हाती घेतल्या. यामध्ये थकबाकी दारांच्या घरांसमोर बँड वाजविणे, थकबाकीदारांना नोटीसा देणे, नावे जाहिर करणे , मिळकती सील करणे, मिळकतीचा लिलाव करणे अशा अनेक प्रकारच्या कारवाई करण्यात येत आहे. यामुळे गेल्या एक वर्षांत शहरातील सुमारे ७०० मिळकतींवर कारवाई करून सील करण्यात आल्या आहेत.
--------------------------