सावकारांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; इंदापूरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 05:31 PM2022-08-24T17:31:17+5:302022-08-24T17:45:00+5:30
तरुणाला व्याजाच्या पैशांसाठी तीन सावकारांनी सातत्याने तगादा लावून दिला मानसिक त्रास
कळस : भरणेवाडी (ता.इंदापूर) येथील जावेद अब्बास मुलाणी (वय ३२ ) या तरुणाने व्याजाच्या पैशांसाठी तीन सावकारांनी सातत्याने तगादा लावून मानसिक त्रास दिल्याने सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत नवाज अब्बास मुलाणी ( वय ४० रा. भरणेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
वालचंदनगर पोलिसांनी प्रफुल्ल रघुनाथ देवकाते ( रा. पिंपळी ता. बारामती), विजय मोटे (रा. निरावागज ता. बारामती) व संदिप अरुण भोसले (रा . निमसाखर, इंदापूर) या तिघांवर व्याजाच्या पैशासाठी तगादा लावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महाराष्ट्र सावकारी अधिनियमानूसार गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्त्येपूर्वी मुलाणी यांनी चिठ्ठी लिहून खिश्यात ठेवली होती. यामध्ये वरील तीन सावकारांची नावे आहेत.
जावेद आब्बास मुलाणी यांनी वरील खासगी सावकरांकडून व्याजाने पैसे घेतले होते. दरम्यान, हे सावकार व्याजाच्या पैशासाठी त्याच्याकडे तगादा लावत होते. जावेद यास वारंवार जिवे मारण्याची धमकी देत होते. त्यामुळे या सावकारांच्या त्रासाला कंटाळून जावेद मुलाणी यांनी मंगळवार दि. २३ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जंक्शन ते कळस रसत्यानजीक असलेल्या पत्र्याचे शेडमधील लोखंडी अँगलला गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी पुढील तपास वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरापा लातूरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे करीत आहेत.