बंगालच्या उपसागरात ‘टिटली’ चक्रीवादळ; ईशान्येकडे सरकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 02:36 AM2018-10-10T02:36:50+5:302018-10-10T02:37:15+5:30
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे टिटली चक्रीवादळात रुपांतर झाले असून त्याचा मोठा फटका उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशा आणि पश्चिम बंगालला बसण्याची शक्यता आहे़.
पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे टिटली चक्रीवादळात रुपांतर झाले असून त्याचा मोठा फटका उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशा आणि पश्चिम बंगालला बसण्याची शक्यता आहे़ जमिनीवर आल्यावर ते ईशान्यकडे जाण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र तसेच मध्य भारतात त्यामुळे पावसाची शक्यता नाही़, असे हवामान विभागाने कळविले आहे़
पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे मंगळवारी सकाळी चक्रीवादळात रुपांतर झाले असून सध्या ते ओडिशातील गोपाळपूर येथून ५३० किमी आणि आंध्र प्रदेशातील कलिंगापट्टणम येथून ४८० किमी दूर आहे़ हे चक्रीवादळ गोपाळपूर आणि कलिंगापट्टणमदरम्यानच्या किनारपट्टीवर ११ आॅक्टोंबरला धडकण्याची शक्यता आहे़ यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १०० किमी इतका असू शकतो़ यामुळे ओडिशा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर १० व ११ आॅक्टोंबरला अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़ तसेच ११ व १२ आॅक्टोंबरला पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा येथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़
राज्याचे तापमान वाढले
गोव्यासह संपूर्ण राज्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ राज्यात शुक्रवारी सर्वाधिक तापमान अकोला येथे ३७़७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ १२ आॅक्टोंबरला कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़