उसने पैसे घ्यायचा; पैसे मागितल्यावर चोरीची बाईक स्वतःची सांगून विकायचा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 01:45 PM2024-08-07T13:45:35+5:302024-08-07T13:45:56+5:30

चोरटा हॉटेलमध्ये सफाई कामगार होता, पगारात घर भागत नसल्याने बाईक चोरायचा आणि विकायचा

To borrow money; After asking for money, he would sell the stolen bike as his own | उसने पैसे घ्यायचा; पैसे मागितल्यावर चोरीची बाईक स्वतःची सांगून विकायचा

उसने पैसे घ्यायचा; पैसे मागितल्यावर चोरीची बाईक स्वतःची सांगून विकायचा

पुणे: तो मूळचा दौंडचा. पुणे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होता. पगारात भागत नसल्याने तो घर चालवण्यासाठी गावातील अनेकांकडून दरवेळी चार पाच हजार उसने घ्यायचा. पैसे देणाऱ्यांनी तगादा लावल्यावर तो चोरीची बाईक स्वत:ची असल्याचे सांगत त्यांना विकत होता. कर्जही फिटत होते, तसेच वरती काही पैसेही त्याला मिळत होते. तो दौंडवरून लोकलने पुण्यात येत होता. आठवड्यातून एखाद्या दुसऱ्यावेळी तो परिसरातून दुचाकी चोरून त्यावरून गावाकडे जात होता. अशा पद्धतीने केवळ कर्जाची परतफेड करण्यासाठी दुचाकी चोरून विकणाऱ्या चोरट्याला समर्थ पोलिसांनी अटक केली.

अरविंद मोतीराम चव्हाण (वय - ३९, रा. दौंड) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. चव्हाणने सोमवार पेठेतील शाहू उद्यान परिसरातून काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरली होती. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी परिसरातील ७० ते ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले होते. पोलिसांनी चोरट्याचा माग काढण्यास सुरुवात केली. पोलिस कर्मचारी कल्याण बोराडे आणि शरद घोरपडे सोमवार पेठेत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांनी संशयित चोरटा चव्हाणला पाहिले. त्यांनी चव्हाणला थांबवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला. चव्हाण पोलिसांना पाहताच दुचाकीवरून पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याची चौकशी केली असता, त्याच्या जवळील दुचाकी चोरीची असल्याचे आढळले. त्याच्याकडून दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरलेल्या दुचाकींची विक्री चाेरट्याने दौंड तालुक्यात केल्याची माहिती तपासात मिळाली आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील रणदिवे, जालिंदर फडतरे, सहायक फौजदार संतोष पागार, अंमलदार इम्रान शेख, रोहिदास वाघेरे, रवींद्र औचरे, शिवा कांबळे, अमोल गावडे, रहिम शेख, शरद घोरपडे, कल्याण बोराडे, अविनाश दरवडे, अर्जुन कुडाळकर यांच्या पथकाने केली.

Web Title: To borrow money; After asking for money, he would sell the stolen bike as his own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.