'लढायचं ते जिंकण्यासाठीच', मनसेचा नवा नारा; वर्धापनदिनाला हजारोंच्या संख्येने मनसैनिक उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 19:01 IST2022-03-09T19:01:12+5:302022-03-09T19:01:34+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंदाचा १६ वा वर्धापनदिन सोहळा पुणे शहरातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला आहे

'लढायचं ते जिंकण्यासाठीच', मनसेचा नवा नारा; वर्धापनदिनाला हजारोंच्या संख्येने मनसैनिक उपस्थित
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंदाचा १६ वा वर्धापनदिन सोहळा पुणे शहरातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मनसैनिक आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. दरवर्षी मुंबईत साजरा होणारा वर्धापन दिन सोहळा यंदा १५ वर्षानंतर प्रथमच पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लढायचं ते जिंकण्यासाठीच या नव्या नाऱ्याने पक्ष महापालिका निवडणुकीत उतरणार आहे.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींचा चांगलाच वेग प्राप्त झाला आहे. सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांचे दौरेही सुरु झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर जागा मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यानिमित्ताने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नियोजनाला सुरुवात केली आहे.
पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे वर्धापनदिन सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. पुणेकरांबरोबरच राज्यभरातून हजारोंच्या संख्येने नागरिक सोहळ्याला उपस्थित राहिले आहेत. रंगमंचावर मराठी गीतांचा कार्यक्रम सुरु आहे. थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.