...त्या सेटलमेंटसाठी पैसे भरावे लागतील; रिया चक्रवर्तीचा फोन आला अन् त्यांनी गमावले १६ लाख
By विवेक भुसे | Published: August 22, 2022 04:58 PM2022-08-22T16:58:57+5:302022-08-22T16:59:06+5:30
कंपनीशी संपर्क न करता सायबर चोरट्यांवर ठेवला विश्वास
पुणे : घरातील कामामध्ये विम्याची कागदपत्रे गहाळ झाल्याने पॉलिसी संपल्यानंतर ते क्लेम करू शकले नाहीत. विम्याचा क्लेम मिळवून देण्याच्या सायबर चोरट्यांच्या आमिषाला ते बळी पडले व त्यांनी तो मिळविण्यासाठी १५ लाख ७४ हजार रुपये भरले. विमा कंपनीशी संपर्क साधल्यावर कंपनीने त्यांच्या प्रीमियमची रक्कम परत केली. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे या ज्येष्ठ नागरिकाच्या लक्षात आले. विमा कंपनीतून पॉलिसीच्या सेटलमेंटसाठी १५ लाख रुपये भरावे लागतील, असे रिया चक्रवर्ती या नावाने त्यांना फोन आला आणि त्यांनी ते भरले.
याप्रकरणी मुकुंदनगर येथे राहणाऱ्या एका ६६ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे कंपनीतून निवृत्त झाले आहेत. कंपनीत असताना त्यांनी विश्य इन्शुरन्स कंपनीत गुंतवणूक केली होती. त्याची मुदत मार्च २०११ मध्ये संपली होती. परंतु, घरातील कामामध्ये त्यांची पॉलिसीची कागदपत्रे गहाळ झाली होती. त्यामुळे त्यांनी क्लेम केला नव्हता. जुलै २०१९ मध्ये नेहा शर्मा असे नाव सांगणाऱ्या महिलेने त्यांना फोन करून तुमची मुदत पूर्ण झालेली रक्कम क्लेम न केल्याने मार्केटमध्ये कंपनीने गुंतविली असून, ती ६ लाख ८ हजार रुपये झाली आहे. तुम्हाला ती मिळवायची असेल तर नवीन पॉलिसी काढाव्या लागतील, असे सांगून त्यांना वेगवेगळ्या ९ पॉलिसी काढल्या. त्यासाठी त्यांनी दिलेल्या खात्यात ६ लाख ५३ हजार रुपये भरले. काही दिवसांनी त्यांना पॉलिसीची कागदपत्रे आली. त्यानंतर नेहा शर्मा व अर्पिता जैन यांचे मोबाईल क्रमांक बंद झाले.
त्यानंतर त्यांना सप्टेंबर २०२० मध्ये रिया चक्रवर्ती हिचा फोन आला. विमा लोकपाल आयआरडीए फंड रिलिजिंग डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून तुम्ही काढलेल्या इन्शुरन्स पॉलिसीची ३२ लाख रुपयांची फाईल आली आहे. त्यावर एजंटने ३२ लाख रुपयांचे कर्ज काढले आहे. तसेच आणखी एक फाईल आली आहे. त्यावर २० लाख रुपयांचे कर्ज काढले आहे, असे एकूण ५२ लाख रुपयांचे कर्ज काढलेले आहे. तुम्हाला तुमच्या पॉलिसीचा क्लेम करायचा असल्यास ॲन्ड ऑन, स्टॅम्प ड्युटी, एनओसी, फुल अ फायनल सेटलमेंट, आदी करावे लागेल, असे सांगून त्याकरिता काही रक्कम तुम्हाला आमच्या बँक खात्यावर पाठवावी लागेल, असे सांगितले. रिया चक्रवर्ती व तिचा सहकारी कबीर त्यागी यांनी क्लेमकरिता सप्टेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान १५ लाख ७४ हजार १८० रुपये भरायला भाग पाडले.
दोघांचेही फोन बंद होते...
पैसे भरल्यानंतर रिया चक्रवर्ती व तिच्या सहकाऱ्याचा मोबाईल बंद लागल्याने फिर्यादी यांनी इन्शुरन्स क्लेमबाबत आयआरडीएकडे पत्राद्वारे मागणी केली. तेव्हा इन्शुरन्स कंपनीने त्यांची पॉलिसी बंद करून त्यांनी भरलेल्या प्रीमियरची सर्व ६ लाख ५३ हजार ९ रुपये त्यांना परत केली. तेव्हा रिया चक्रवर्ती आणि कबीर त्यागी यांनी पॉलिसीचा क्लेम करून देण्याचा बहाणा करून त्यांची १५ लाख ७४ हजार १८० रुपयांची फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यांनी स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करीत आहेत.