World No Tobacco Day: ऐन तारुण्यात व्यसन; आधी दारूला हरवले, मग तंबाखूशी लढला अन् जिंकलाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 12:57 PM2023-05-31T12:57:20+5:302023-05-31T13:00:41+5:30
तंबाखू हे छाेटे व्यसन नसून देशात सगळ्यात जास्त मृत्यू तंबाखूमुळे हाेतात
पुणे : ताे अवघ्या पस्तिशीतील कामगार. दारू, तंबाखू आणि सिगारेटचे व्यसन जडलेले. दारू तर पाच वर्षांपूर्वी सुटली; परंतु तंबाखूची सवय चिवट. ती काही सुटेना. साेबत खाेकला आणि दमही लागायचा. अखेर ताे तंबाखू व सिगारेट साेडण्यासाठी येरवड्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात ॲडमिट झाला. तेथे समुपदेशन आणि औषधाेपचारानंतर त्याने तंबाखू साेडून दिली ती कायमचीच, व्यसन समुपदेशक माधव काेल्हटकर यांनी ही माहिती दिली. तंबाखूचे व्यसन साेडणे सर्वांत कठीण व्यसन समजले जाते. कारण त्याची तल्लफ ही खूप असते. परंतु, ते साेडले जाऊ शकते. हे कामगाराने सिद्ध केले आहे. गुरुवारी जागतिक तंबाखूविराेधी दिवस साजरा केला जाताे. या पार्श्वभूमीवर ही कहाणी निश्चितच प्रेरणादायी आहे.
तंबाखू हे छाेटे व्यसन नाही. देशात सगळ्यात जास्त मृत्यू तंबाखूमुळे हाेतात. तंबाखू ही घरीही इच्छाशक्तीवर बंद करू शकतात. काहींना औषधाेपचार लागताे. याबाबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या, ‘‘आमच्याकडे दारूबराेबर तंबाखूचेही व्यसन असलेले आणि ते साेडण्यासाठी महिन्याला दीडशे पेशंट दाखल हाेतात. आम्ही त्यांना तंबाखूदेखील साेडायला सांगताे तेव्हा ते म्हणतात की, तंबाखू हे छाेटे व्यसन आहे. मग हे का साेडायचे. त्यावेळी आम्ही सांगताे की तंबाखू हे देखील माेठे व्यसन, वेगवेगळ्या प्रकारचा कॅन्सर हाेताे. त्यांचे समुपदेशन आणि औषधाेपचार करून ते साेडतात.
खरे तर तंबाखूचे व्यसन साेडताना त्रास होताे; कारण तंबाखूची तल्लफ जबरदस्त असते, अनेकांचे पाेट साफ हाेत नाही. त्यांच्यामध्ये अस्वस्थपणा, चिडचिड वाढते. झाेप येत नाही. मात्र, हा त्रास कमी करण्यासाठी औषधे उपलब्ध आहेत. हे व्यसन ॲडमिट असताना साेडायला साेपे जाते, परंतु, ओपीडी बेसिसवर थाेडं अवघड जाते. त्यासाठी वेगवेगळे उपाय करावे लागतात.
एक दिवस तंबाखू साेडण्याचा स्वत:साठी निश्चय करा
तंबाखू साेडण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. एक दिवस तंबाखू साेडण्याचा स्वत:साठी निश्चय करा. कारण एक दिवसाचा निश्चय पाळणे साेपे असते. आयुष्याचा निश्चय केला तर ते दडपण येते. काही लाेकांना तर एक तासाचे ध्येय ठेवावे लागते. तल्लफ येते तेव्हा आधीपासूनच प्लॅन करा. त्यावेळी वाचन करा, टीव्हीवर आवडीचा शाे पाहा, घरच्यांसाेबत गप्पा मारा. कारण रिकामे असताना तल्लफ येण्याचे प्रमाण जास्त असते. साेडताना फार फार तर तीन ते चार दिवस त्रास हाेताे. त्यानंतर मात्र, फ्रेश वाटते. - मुक्ता पुणतांबेकर, संचालिका, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र
तंबाखू साेडण्यासाठी काय उपाययाेजना कराल?
- शक्यताे तंबाखूची सवयच लावून घेऊ नका.
- तंबाखू किंवा सिगारेटची तल्लफ हाेईल तेव्हा तोंडात दालचिनीचा तुकडा ठेवा. याने तल्लफ कमी हाेईल अन् फ्रेश देखील वाटेल.
- तंबाखूत निकोटीन असते, ते शरीरातील व्हिटॅमिन सी काढून टाकते, त्यामुळे पुन्हा पुन्हा सिगारेट किंवा तंबाखू खायची इच्छा होते. त्यामुळे व्हिटॅमिन सीचा स्राेत असलेल्या पपई, संत्री, पेरू, किवी किंवा लिंबूपाणीसारख्या व्हिटॅमिन सी समृद्ध असलेली फळे खा.
- जेव्हा-जेव्हा तंबाखू खावीशी वाटेल, तेव्हा चिंगम ताेंडात टाका आणि चघळत राहा, त्यामुळे तंबाखूची इच्छा कमी हाेण्यास मदत हाेईल.
- एक चमचा आल्याचा रस मधात मिसळून घेतल्यानेही तंबाखूची इच्छा संपते.
- मन शांत राहण्यासाठी योग आणि ध्यान करा. व्यसन साेडल्यामुळे हाेणारी बेचैनी हे तुमचे मन शांत करण्यास मदत हाेते.