शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री
By Admin | Published: June 1, 2017 02:56 AM2017-06-01T02:56:03+5:302017-06-01T02:56:03+5:30
शाळा आणि महाविद्यालयाच्या शंभर मीटर परिसरात सिगरेट व तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम २००३ कायद्यान्वये तंबाखूजन्य पदार्थांची
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शाळा आणि महाविद्यालयाच्या शंभर मीटर परिसरात सिगरेट व तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम २००३ कायद्यान्वये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास प्रतिबंध आहे, मात्र कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीअभावी बुधवारी जागतिक तंबाखूविरोधी दिनीदेखील शहरातील काही शाळांबाहेर सरार्सपणे पानटपऱ्या आणि दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे लोकमतने केलेल्या पाहाणीत आढळले.
तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने कर्करोगाला आमंत्रण मिळू शकते. लहान मुलांसह तरुणांमध्ये या पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याचा विचार करून शासनाने शाळांसह महाविद्यालयाच्या शंभर मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास कायद्यान्वये निर्बंध घातले आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या पानटपऱ्या आणि दुकानांवर कारवाईचा बडगा अन्नऔषध प्रशासनाकडून उगारला जात असला तरी, याबाबत समाजामध्ये तितकेसे गांभीर्य नाही, हेच या पाहणीदरम्यान समोर आले आहे.
जागतिक तंबाखूविरोधी दिनी अन्न व औषध प्रशासनाकडून पुणे विभागात विशेष मोहीम राबविण्यात आली. शाळा व महाविद्यालयाच्या शंभर मीटरच्या परिसरात असलेल्या दुकानांसह १८ वर्षांखालील मुलाला तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याबददल विक्रेता यांच्याकडून ४७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर गुटखा विक्रीस बंदी असतानाही साठा करणाऱ्या एका विक्रेत्याकडून ८६ हजार ५७० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. तसेच १६०० रुपयांच्या इम्पोर्टेड सिगरेटचा मोठा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय पुणे हॉॅटेल अँड रेस्टॉरन्ट असोसिएशनची बैठक घेऊन त्यांचे प्रबोधन करण्यात आले. स्मोकिंग झोनचा बोर्ड लावणे बंधनकारक आहे, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशा सूचना देण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी शिवाजी देसाई यांनी दिली.
राजरोस विक्री
1जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त लोकमतने शाळा व महाविद्यालयाच्या आवारातील स्थितीचा आढावा घेतला. शहरातील सोमवार पेठ, रास्ता पेठ, कसबा पेठ, रमणबाग चौक, टिळक रस्ता अशा विविध भागांमध्ये शंभर मीटरच्या आतमध्येच पानाच्या टपऱ्या आणि दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असल्याचे दिसून आले. शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात सर्रासपणे होणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीमुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लहान वयात अशी मनोवृत्ती किंवा अनुकरणातून लागलेली तंबाखू आणि धूम्रपानाची सवय अतिशय धोकादायक ठरू शकते.
2धूम्रपान, मद्यपान इतर अमली पदार्थांचे सेवन करणे, मौजमजा करणे म्हणजेच चांगले आयुष्य जगणे असा तरुणाईचा गैरसमज आहे. तंबाखूजन्य पदार्थांचा शरीरावर होणारा वाईट परिणाम आणि त्याचे सेवन करणे म्हणजे स्वत:चे नुकसान क रून घेणे, सिगरेट, तंबाखूच्या पाकिटावर सावधानतेचा वैधानिक इशारा दिलेला असतो. हे सगळे पाहून किंवा माहिती असतानाही लोक याकडे दुर्लक्ष करून धूम्रपानाच्या आहारी जात आहेत ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल.
किराणा दुकानातही सर्रास विक्री
शाळा, महाविद्यालयाजवळील अनेक ठिकाणच्या पानटपऱ्या बंद झाल्याचे दिसून येतातच; त्याच ठिकाणी जवळ असलेल्या किराणा दुकानदारांनी त्याचा गैरफायदा घेतला आहे़ या दुकानातून आता सिगरेट, तंबाखूची विक्री सुरू झाली आहे़ पण, या दुकानावर पानटपऱ्यांसारखी काहीही निशाणी नसल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही़ अनेक दुकाने, तर शाळा, महाविद्यालयांच्या अगदी समोर आहेत़ उपनगरांमध्येही हेच दृश्य दिसून येत आहे़