देशातील ११ कोटी जनतेला आज ही आरोग्य सेवा मिळत नाही - डॉ. अभय बंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 12:44 IST2025-02-06T12:41:26+5:302025-02-06T12:44:21+5:30

लोकसेवेसाठी जीवन समर्पित करा असे आवाहन विचार सामाजिक कार्यकर्ते व सर्च फाउंडेशनचे संचालक डॉ. अभय बंग यांनी केले.

Today 11 crore people of the country do not get this health service. Dedicate your life to their service. | देशातील ११ कोटी जनतेला आज ही आरोग्य सेवा मिळत नाही - डॉ. अभय बंग

देशातील ११ कोटी जनतेला आज ही आरोग्य सेवा मिळत नाही - डॉ. अभय बंग

पुणे : देशातील ११ कोटी जनतेला आज ही आरोग्य सेवा मिळत नाही. त्यांच्या सेवेसाठी आपले जीवन अर्पित करा, असे आवाहन विचार सामाजिक कार्यकर्ते व सर्च फाउंडेशनचे संचालक डॉ. अभय बंग यांनी केले. विनोबा भावे यांनी ‘जय जगत’ या शब्दांचे उच्चारण केले. आज तीच अनुभूती डॉ. विश्वनाथ कराड यांचे विश्व शांतीचे कार्य पाहून होत आहे, असे कौतुकोद्गार देखील त्यांनी काढले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे भारत, पुणे यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार २०२५ प्रदान समारंभ पार पडला. त्यावेळी पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, तसेच जगविख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर व आबुधाबी स्कूल ऑफ मॅनेजमेंट बोर्डाचे अध्यक्ष डॉ. तईब कमली याशिवाय एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष व भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार समितीचे निमंत्रक राहुल विश्वनाथ कराड, डॉ. मंगेश तु. कराड व कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस उपस्थित होते.

यावेळी अहमदाबाद येथील आयआयएमचे संचालक प्रा. भरत भास्कर यांना भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार, डब्ल्यूएचओच्या माजी प्रमुख शास्त्रज्ञ व एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना भारत अस्मिता विज्ञान-तंत्रज्ञान श्रेष्ठ पुरस्कार, सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व लेखक विवेक अग्निहोत्री आणि प्रख्यात गायक व संगीतकार शेखर सेन यांना भारत अस्मिता जन जागरण श्रेष्ठ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येकी अडीच लाख रुपये, सन्मानपत्र व स्मृती चिन्ह हे पुरस्काराचे स्वरूप होते.

फाउंडर्स डे निमित्त डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचा उपस्थित पाहुण्यांनी घोंगडी, तुकाराम महाराजांची पगडी, सायटेशन्स ऑफ ऑनर आणि विणा देऊन सत्कार करण्यात आला.

डॉ. अभय बंग म्हणाले, आजचे युग भौतिकवादी जगाकडे पळत आहे, परंतु येथे विज्ञान, अध्यात्म आणि विवेकानंद यांचा संगम पाहताना आनंद होतो. आजचा पुरस्कार हा गडचिरोलीतील सर्व नागरिकांना समर्पित करत आहे.

डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, समाजासाठी कार्य करणाऱ्या सर्व पुरस्कार्थींचा सर्वांनी आदर्श घेऊन सामाजिक कार्य करावे. भारत अस्मिता पुरस्कार विजेते खऱ्या अर्थाने युवकांचे प्रतीक आहेत. तरुणांनी आपली ऊर्जा सकारात्मक कार्यासाठी वापरावी, यासाठी लक्ष केंद्रित करावे. पुरस्कारार्थींनी मनोगते व्यक्त केली. प्रा. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले आणि डॉ. मंगेश कराड यांनी आभार मानले.

Web Title: Today 11 crore people of the country do not get this health service. Dedicate your life to their service.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.