निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर आज मान्सूनचा पहिला अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 06:25 AM2019-04-15T06:25:20+5:302019-04-15T06:25:29+5:30
निवडणूक वर्षात यंदाचा मान्सून कसा असेल, याविषयी सध्या सर्वत्र उत्सुकतेचा विषय असून भारतीय हवामान विभागातर्फे पहिला दीर्घकालीन पावसाचा अंदाज सोमवारी दुपारी जाहीर करण्यात येणार आहे़
पुणे : निवडणूक वर्षात यंदाचा मान्सून कसा असेल, याविषयी सध्या सर्वत्र उत्सुकतेचा विषय असून भारतीय हवामान विभागातर्फे पहिला दीर्घकालीन पावसाचा अंदाज सोमवारी दुपारी जाहीर करण्यात येणार आहे़ आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक आयोगाने हा अंदाज जाहीर करण्यास परवानगी दिली आहे़ मात्र, त्या पत्रकार परिषदेला केंद्रीय मंत्र्यांना उपस्थित राहता येणार नाही, असा आदेश दिला असल्याचे सांगण्यात आले़
देशभरातील मान्सून कसा असणार याचा पहिला दीर्घकालीन अंदाज हवामान विभागामार्फत १५ एप्रिलच्या दरम्यान जाहीर केला जातो़ त्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती पुण्यातील केंद्रामार्फत नवी दिल्ली कार्यालयाला पाठविण्यात आली आहे़ आचारसंहिता असल्याने मान्सूनचा अंदाज जाहीर करण्यासाठी हवामान विभागाने निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती़ त्यात त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना यावेळी उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती़ त्यावर निवडणूक आयोगाने या पूर्वी मान्सूनचा अंदाज व्यक्त करताना कोणी मंत्री उपस्थित राहिले होते का याची माहिती मागवली़
अधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदेला निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे़ मात्र, यावेळी केंद्रीय मंत्र्यांना उपस्थित राहता येणार नाही, अशी सूचना केली़
मान्सूनचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असल्याने तो नेमका कसा असेल, याविषयी सर्व क्षेत्रात उत्सुकता असते़ त्यात यंदा एल निनोचा प्रभाव असल्याने त्याचा भारतीय मान्सूनवर विपरित परिणाम होणार असल्याचा अंदाज अमेरिकन हवामान संस्था,आॅस्ट्रेलियन संस्था तसेच स्कायमेट यांनी व्यक्त केला आहे़ स्कायमेटने यंदा सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता़
>यंदाच्या पावसाचे काय?
गेल्या वर्षी भारतीय हवामान विभाग व स्कायमेटने ९७ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता़ मात्र, २०१८ मध्ये सरासरीच्या ९१ टक्के पाऊस होऊन देशाच्या अनेक भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे यंदा पाऊस कसा असणार याविषयी उत्सुकता वाढली आहे़