माऊलींच्या चलपादुकांचे आज वैभवी प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:08 AM2021-07-02T04:08:29+5:302021-07-02T04:08:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आळंदी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारीच्या १९१ व्या सोहळ्याचे शुक्रवारी (दि.२) सायंकाळी चारच्या सुमारास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आळंदी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारीच्या १९१ व्या सोहळ्याचे शुक्रवारी (दि.२) सायंकाळी चारच्या सुमारास प्रस्थान होणार आहे. शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून निमंत्रित वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या चांदीच्या चलपादुका मुख्य मंदिरातून प्रस्थान ठेवणार आहेत. तत्पूर्वी माऊलींचे मंदिर व परिसराचे निर्जंतुकीकरण केले असून प्रस्थान संबंधित वारकऱ्यांची कोविड चाचणी करण्यात आली आहे.
माऊलींच्या आषाढी वारी प्रस्थान सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ वद्य अष्टमीला अर्थातच शुक्रवारी (दि.२) पहाटे चार ते साडेपाच वाजता माउलींच्या संजीवन समाधीवर पवमान अभिषेक, दुधारती व आरती होईल. दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान माऊलींना नैवद्य दाखविला जाईल. नंतर दुपारी चारला प्रस्थानच्या मुख्य कार्यक्रमास सुरूवात होईल. मोजक्या ब्रह्मवृंदाच्या हस्ते माउलींच्या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पोशाख केला जाईल. त्यानंतर माऊलींची व गुरू हैबतबाबांची आरती होईल.
देवस्थानच्या विश्वस्तांकडून माऊलींच्या पादुका परंपरेनुसार पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हातात देऊन मुख्य मंदिरातून चलपादुकांचे प्रस्थान होईल. वीणा मंडपातून पादूका बाहेर आणल्यानंतर टाळ-मृदंगाच्या निनादात मंदिर प्रदक्षिणा होईल. त्यानंतर देऊळवाड्याच्या दरवाजाने पादुका लगतच्याच आजोळघरात फुलांनी सजविलेल्या आसनावर विराजमान केल्या जातील. आजोळघरातच माऊलींचा सतरा दिवस मुक्काम असणार आहेत. याठिकाणी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत दैनंदिन कीर्तन आणि जागरचा कार्यक्रम होईल.
राज्य सरकार आदेशानुसार आषाढ शुद्ध दशमीला (१९ जुलै) माऊलींच्या चलपादुका लालपरीतून पंढरपुरीला विठूरायाच्या भेटीला घेऊन जाणार आहेत. दरम्यान अलंकापुरीत संचारबंदी लागू असल्याने समाधी मंदिर बंद आहे. त्यामुळे प्रस्थान सोहळ्यास परवानगीशिवाय कोणीही येऊ नये, असे आवाहन आळंदी सोहळा प्रमुख विश्वस्त अॅड. विकास ढगे-पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी केले आहे.
चौकट :
माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला संबंधित परंपरेने आवश्यक असे मोजकेच मानकरी, सेवेकरी तसेच सोहळ्यासाठी नोंदविलेल्या प्रत्येक दिंडीतील एक याप्रमाणे एकूण साडेतीनशे वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. तसा दुरुस्तीचा आदेश दरम्यान मंदिरात प्रवेश करणाऱ्यापूर्वी संबंधितांना थर्मल स्कॅन व सॅनिटाईज करून मास्क लावल्यानंतर त्यांना मंदिरात घेतले जाईल.
फोटो ओळ : तीर्थक्षेत्र आळंदीत प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध फुलांनी मंदिर सजावटीचे काम सुरू आहे. तर दुसऱ्या छायाचित्रात एरवी भाविकांच्या गर्दीने फुलून निघणारा पवित्र इंद्रायणी घाट भाविकांविना सुनासुना झाला आहे. (छाया : भानुदास पऱ्हाड)