Corona virus pune : प्रशासनाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा; पुणे व्यापारी महासंघाचा संचारबंदीच्या निर्णयाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 06:01 PM2021-04-02T18:01:48+5:302021-04-02T19:10:12+5:30
व्यापारी वर्गाला सकाळी १० ते रात्री ९ दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्या व्यापाऱ्यांची मागणी
पुणे : मागील वर्षी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून अद्यापही व्यापारी वर्ग पूर्णपणे सावरलेला नाही. त्यातच आता पुन्हा एकदा शहरात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंतच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेले व्यावसायिक पुन्हा एकदा कात्रीत सापडले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नवीन नियमावलीला विरोध दर्शविला आहे. तसेेेच आपल्या निर्णयावर फेरविचार करत व्यापारी वर्गाला सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत खुले ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी केली आहे.
पुण्यात पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोनाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या वेळी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्बंधांना विरोध होताना दिसत आहे. प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात व्यापारी वर्गाने उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे.
रांका म्हणाले; आधी राज्य सरकारने रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत संचारबंदी लागू केली होती. त्यावेळी व्यापारी संघाने सरकारच्या या निर्णयाला विरोध न करता पूर्णपणे सहकार्य केले. पण आता ही वेळ आणखी कमी करण्यात आल्यामुळे आम्ही व्यापारी वर्ग या निर्णयाचा निषेध व्यक्त करत आहोत.
रांका म्हणाले, आधीच्या निर्णयावर पुणे व्यापारी महासंघाने एक तास वेळ वाढवून मागितली होती. त्यावर काही चर्चा झाली नाही. त्यानंतर नवीन नियमावली जाहीर होण्याअगोदर प्रशासनाने व्यापारी प्रतिनिधींशी बोलणे गरजेचे होते. व्यापारी आणि जनतेची मत न घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी सहा वाजता दुकाने उघडणे अशक्य आहे असेही रांका म्हणाले.
शहरात सकाळी ११ शिवाय कोणत्याही बाजारपेठ उघडत नाही. मात्र,सायंकाळी ६ वाजता बंद करावे लागणार आहे. या वेळेत कितपत व्यवसाय होणार हा प्रश्न आहे.
सण उत्सवांवर होणार परिणाम....
महाराष्ट्रात गुढीपाडवा सण उत्साहात साजरा केला जातो. १३ एप्रिलला गुढीपाडवा आहे. नवीन वर्षाची सुरुवात करून देणाऱ्या या सणाला आता विरजण आले आहे. मागच्या वर्षीही हा सण उत्साहात साजरा करता आला नाही.
व्यापारी वर्गाला सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत खुले ठेवण्याची परवानगी द्या
प्रशासनाने जनता आणि व्यापाऱ्यांचा विरोध लक्षात घेणे गरजेचे आहे. सायंकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंतच्या संचारबंदीवर फेरविचार करावा. सर्व व्यापारी वर्गाला सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत खुले ठेवण्याची परवानगी द्यावी. अशी मागणीही रांका यांनी यावेळी केली आहे.