Pune Rain: पुण्यात आजही धो - धो; मॉन्सून परत जातोय की, परत आलाय? पुणेकरांचा प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 02:48 PM2024-09-25T14:48:17+5:302024-09-25T14:49:09+5:30
पुण्यामध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये मॉन्सूनचा पाऊस सरासरीहून अधिक पडला असून परतीच्या प्रवासाला निघालेल्या पावसाने आता चांगलाच जोर धरला आहे
पुणे: गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या मान्सूनने आपल्या परतीच्या प्रवासात पुणेकरांवर चांगलीच कृपादृष्टी दाखविली अन् मुसळधार पावसाने पुणेकरांची दाणादाण उडवली आहे. आज सकाळपासून पुन्हा ढगाळ वातावरण झाले होते. दुपारच्या सुमारास शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अवघ्या काही मिनिटातच रस्ते जलमय झाले. तर अनेक भागात वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले.
पुणे शहर, उपनगर आणि ग्रामीण भागामध्ये सध्या पासून पडत आहे. सकाळपासून अंधारून आल्याने सूर्यनारायणाचे दर्शनही पुणेकरांना झाले नाही. जोरदार पावसामुळे शहरातील विविध सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली. तसेच शहरात मेट्रोची कामे सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. शहरात दोन दिवसांपासून होणाऱ्या जोरदार पावसामुळे रस्त्यांना पुन्हा नद्यांचे स्वरूप येत आहे. शिवाजीनगर, एरंडवणा, सिंहगड रस्ता, बाणेर-बालेवाडी, सातारा रस्ता, कात्रज, लष्कर परिसर, हडपसर, कात्रज, लोहगाव विमाननगर अशा सर्वच परिसरांत मुसळधार पावसाने हजेरी लावली.
मॉन्सून परत जातोय की परत आलाय !
पुण्यामध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये मॉन्सूनचा पाऊस सरासरीहून अधिक पडला आहे. परतीच्या प्रवासाला निघालेल्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे पुणेकर सोशल मीडियावर मॉन्सून परत जातोय की, परत आलाय? यावर विनोद करत आहेत. मॉन्सून आल्यावर ज्या प्रकारचे वातावरण तयार होते, अगदी तशीच स्थिती सध्या निर्माण झाली आहे.
पुणे जिल्ह्यात आज ‘रेड अलर्ट !’
मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी बुधवारी (दि.२५) जोरदार ते अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तसेच नगर आणि नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. पुण्यात २५ नंतर दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.