मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस; बुधवारी आठ अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 09:05 AM2024-04-25T09:05:13+5:302024-04-25T09:05:34+5:30
बुधवारपर्यंत एकूण अठरा जणांनी अर्ज दाखल केले आहेत....
पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मावळमध्ये मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या गुरूवार शेवटचा दिवस आहे. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे बुधवारी (दि. २४) ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. बुधवारपर्यंत एकूण अठरा जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
मंगळवारी दाखल केलेल्या अर्जामध्ये वंचितच्या माधवी जोशी, भिमसेना पक्षाकडून संतोष उबाळे, धर्मराज पक्षाकडून महेशसिंग ठाकूर, मधुकर थोरात, सुहास राणे, राहुल मदने, तुषार लोंढे, शिवाजी जाधव यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. तसेच संजोग वाघेरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
पाच व्यक्तींनी १२ अर्ज नेले -
आकुर्डीतील पीएमआरडीएच्या कार्यालयातून बुधवारी पाच व्यक्तींनी १२ अर्ज नेले. गेल्या सात दिवसांत ७४ जणांनी १४६ अर्ज नेले आहेत. अर्ज भरण्यास आज शेवटचा दिवस असल्याने आज जास्त अर्ज येतील, अशी शक्यता दीपक सिंगला यांनी वर्तविली आहे.