आज खासगीत कोणाचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करायचे ते ठरतं ! हे राजकारणामागील राजकारण - हर्षवर्धन पाटील
By श्रीकिशन काळे | Published: December 4, 2023 02:19 PM2023-12-04T14:19:55+5:302023-12-04T14:20:16+5:30
पूर्वी राजकारणात कोणत्याही पक्षाचे असले तरी योग्य मान दिला जात असे, पण आता मात्र एकमेकांवर आरोप केले जातात
पुणे : सध्या राजकारणात कोण कुठे असेल, ते सांगता येत नाही. आज कोणत्या पक्षात आहे, ते पहावे लागते. उद्या कोणत्या पक्षात असतील, ते माहिती नसते. तसेच कोणाला जर शुभेच्छा दिल्या, तरी त्याला राजकारण समजले जाते. नेमके कशासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत, ते समजत नाही. पण कोणाचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करायचा असेल, तर तो आज केला जातो, असे राजकारणामागील राजकारण ज्येष्ठ माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उलगडले.
स्वा. रामभाऊ बराटे मित्र परिवारातर्फे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती (बांधकाम व आरोग्य) स्व. रामभाऊ बराटे यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (दि.४) कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांना आदर्श कार्यकर्ता पुरस्कार तर कीर्तनकार हभप चंद्रकांत वांजळे महाराज यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हर्षवर्धन पाटील आणि माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, माजी आमदार संभाजी कुंजीर, बापूसाहेब पठारे, विकास दांगट पाटील आदी उपस्थित हाेते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, पूर्वीचे राजकारण आता राहिले नाही. आम्ही १९९०-९२ च्या साली राजकारणात नव्या दमाचे लोकं आलो होतो. तेव्हा राजकारणात कोणी कोणत्याही पक्षाचे असले तरी त्याला योग्य तो मान दिला जात असे. पण आता मात्र एकमेकांवर आरोप केले जातात. जिल्हा परिषदेमध्ये देखील वातावरण बदलले आहे. रामभाऊ बराटे यांनी ज्या विचारांनी राजकारण केले, त्या विचारांची आज गरज आहे.’’
अप्पासाहेब शिवतरे हे जेव्हा सभापती होते, तेव्हा ते काम झाले की जिल्हा परिषदेची गाडी कार्यालयात लावत असत आणि पायी किंवा सायकलवर ते घरी जात. त्यांनी सर्व काम समाजासाठी केले. आज ते पहायला मिळत नाही. रामभाऊ बराटे यांचे देखील मोठे योगदान आहे. त्यांच्या स्मृती जपण्याचे काम त्यांचे मित्र करत आहेत. - उल्हास बापट, माजी आमदार