अकरावी प्रवेशासाठी आज शेवटचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 02:24 AM2018-07-09T02:24:14+5:302018-07-09T02:24:41+5:30
अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादीत पहिल्या पसंती क्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आज (सोमवार, ९ जुलै) शेवटचा दिवस आहे.
पुणे - अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादीत पहिल्या पसंती क्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आज (सोमवार, ९ जुलै) शेवटचा दिवस आहे. इतर विद्यार्थ्यांना मिळालेले महाविद्यालय पसंत नसल्यास त्यांना पुढील फेऱ्यांमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध असणार आहे.
केंद्रीय आॅनलाइन प्रवेश नियंत्रण समितीतर्फे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या इयत्ता अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अकरावी प्रवेशासाठी ७५ हजार ९३९ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे, त्यापैकी ४१ हजार ९६१ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. त्यापैकी पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १७ हजार १८९ इतकी आहे. या १७ हजार १८९ विद्यार्थ्यांना सोमवारी प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे, अन्यथा त्यांना प्रवेशाच्या सर्व फेºया पूर्ण झाल्यानंतर प्रवेश दिला जाणार आहे.
पहिल्या पसंती क्रमाव्यतिरिक्त अन्य २ ते १० पर्यंतच्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असल्यास त्यांना प्रवेशासाठी पुढील फेºयांमध्ये संधी उपलब्ध असणार आहे. प्रवेश घेऊन रद्द केल्यास त्या विद्यार्थ्यांना ब्लॉक केले जाणार आहे. दरम्यान, पहिल्या फेरीनंतर रिक्त जागांचा तपशील आणि कटआॅफ गुण १० जुलै रोजी संकेतस्थळावर प्रकाशित केला जाणार आहे.