बारामतीत आज मराठा मूक मोर्चा
By admin | Published: September 29, 2016 06:11 AM2016-09-29T06:11:49+5:302016-09-29T06:11:49+5:30
कोपर्डीतील बलात्कार व हत्या प्रकरणाचा निषेध, अॅट्रॉसिटी कायद्यात शिथिलता आणावी; तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह अन्य मागण्यांसाठी आज
बारामती : कोपर्डीतील बलात्कार व हत्या प्रकरणाचा निषेध, अॅट्रॉसिटी कायद्यात शिथिलता आणावी; तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह अन्य मागण्यांसाठी आज (दि. २९ सप्टेंबर) रोजी सकल मराठा समाजाचा मूक मोर्चा बारामतीमध्ये होणार आहे. त्याची सर्व तयारी झाली आहे.
मोर्चात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या मराठा बांधवांची गैरसोय होऊ नये, यासाठीदेखील नियोजन केले असल्याची माहिती आयोजकांनी केली. मोर्चासाठी ठिकठिकाणी कॅमेऱ्यांमधून चित्रीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ड्रोन कॅमेऱ्याद्वारेदेखील मोर्चाचे छायाचित्र टिपले जाणार आहेत.
बारामतीच्या कसबा भागातील शिवाजी उद्यानमधील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सकाळी १०.३० वाजता अभिवादन केल्यानंतर, बरोबर ११ वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. बारामतीसह शेजारच्या तालुक्यातून मराठा बांधव या मोर्चासाठी सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर अहमदनगर, सोलापूर, सातारा या जिल्ह्यातूनदेखील मराठा बांधव मोर्चाला येणार आहेत. नीरा - बारामती रस्त्यावर भव्य कमान उभारली आहे.