"विठ्ठलनामाचा गजर, गरजे अवघे शहर"; आज माऊली अन् तुकोबांचा पुण्यात मुक्काम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 10:44 AM2022-06-23T10:44:11+5:302022-06-23T10:45:56+5:30
शहरात दोन दिवसांचा मुक्काम करून शुक्रवारी पहाटे दोन्ही पालख्यांचे पंढपूरकडे प्रस्थान हाेणार आहे.
पुणे : खांद्यावर पताका, हातात चिपळ्या, टाळ-वीणा, डोक्याला उभा गंध लावलेले वारकरी, तसेच डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या महिलांनी केलेल्या विठुनामाच्या गजराने अवघे शहर दुमदुमले. मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंड्यांनी पुण्यातील सर्वच रस्ते, गल्लीबोळा गजबजलेल्या आहेत. या वातावरणाने मुठा नदीतीरी अवघे पंढरपूर अवतरल्याचा प्रत्यय पुणेकरांना आला. हा भक्तीचा साेहळा आणि भाविकांचा महासागर पाहून संतांनी वर्णन केलेल्या स्वर्गीच्या सुखाचीच अनुभूती भाविकांना आली.
आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र आळंदी आणि देहूमधून निघालेला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी साेहळ्याचे बुधवारी पुण्यनगरीत आगमन झाले. दिंड्यांमधील वारकऱ्यांनी अवघे पुणे विठुमय करून टाकले. शहरातील भाविकांनी पालख्यांबरोबरच वारकऱ्यांचेही भक्तिभावाने स्वागत केले. शहरात दोन दिवसांचा मुक्काम करून शुक्रवारी पहाटे दोन्ही पालख्यांचे पंढपूरकडे प्रस्थान हाेणार आहे.
कोरोना संकटामुळे मागील दाेन वर्षे पायी साेहळा हाेऊ शकला नव्हता. या विरहानंतर पायी पालखी आल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी आज सकाळपासून माेठी गर्दी केली आहे. अनेक पालकांनी बरोबर आणलेल्या लहान मुलांनाही पादुकांवर डोके टेकवायला लावून त्यांच्यात विठुदर्शनाची ओढ निर्माण केली. अनेक तरुण मुले-मुलीही ग्रूपने दर्शनासाठी आली आहेत. पालखीमार्ग ठिकठिकाणी रांगोळीने सजवण्यात आला आहे. पुण्यातील अनेक मंदिरात टाळ - मृदंगाच्या गजरात भजनं सुरु झाली आहेत. गणेश मंडळे, सामाजिक संस्था यांच्याकडून वारकऱ्यांना खाद्यपदार्थ वाटप केले जात आहे. वारकरी शहरातील नवीन वस्तू घेण्यातही दंग झाले आहेत.
भवानी आणि नाना पेठेला जत्रेचे स्वरूप
पुण्यात काल दोन्ही पालख्यांचे आगमन झाले. संत तुकारामांची पालखी नानापेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी आहेत. सकाळपासूनच माऊली आणि तुकोबांचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे. जणू काही दोन्ही पेठांना जत्रेचे स्वरूप आले आहे. खेळणी, दैनंदिन गृहपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ असे अनेक स्टॉल मंदिराबाहेर लागले आहेत. मंदिराच्या आवारात वारकऱ्यांची राहण्याची सोय देखील करण्यात आली आहे. शहरात अनेक कार्यालय, हॉटेल मध्येही वारकऱ्यांची राहण्याची सोय करण्यात आली होती. आज मंडळांकडून वारकरी आणि भक्तगणांसाठी भोजन आयोजिय करण्यात आले आहे.
दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच वारकरी पुण्यात दाखल होत हाेते. पालख्यांबरोबर असलेल्या दिंड्यांचा मुक्काम दरवर्षी ठरलेल्या ठिकाणी असतो. संत तुकाराम महाराजांची पालखी सायंकाळी ५.५२ वाजता संचेती पुलाजवळ आली. पुणे बार असोसिएशनच्या वतीने हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव करण्यात आला. संत तुकारामांची पालखी नानापेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायला सायंकाळी बराच उशीर झाला. वाहतूक शाखेने फर्ग्युसन रस्ता आणि पालखी जाणार असलेल्या अन्य रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवल्याने शहरात वाहतूक काेंडी झाली नाही.