साहित्यिकांच्या मांदियाळीत सारस्वतांचा आज सन्मान
By Admin | Published: November 22, 2015 03:41 AM2015-11-22T03:41:15+5:302015-11-22T03:41:15+5:30
मराठी साहित्यविश्वात मोलाची भर घालणाऱ्या सारस्वतांचा गौरव करण्यासाठी ‘लोकमत माध्यम
पुणे : मराठी साहित्यविश्वात
मोलाची भर घालणाऱ्या सारस्वतांचा गौरव करण्यासाठी ‘लोकमत माध्यम समूहा’च्या वतीने आयोजित मोहर
ग्रुप प्रस्तुत ‘लोकमत साहित्य पुरस्कारां’चा दिमाखदार सोहळा आज (दि. २२) पुण्यात रंगणार आहे.
राज्यभरातील नामवंत, कर्तृत्ववान अशा साहित्यिकांच्या, प्रकाशकांच्या व जाणकार रसिकांच्या उपस्थितीत मान्यवर साहित्यिकांना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करून त्यांच्या साहित्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा करण्यात येणार आहे. हा समारंभ हॉटेल हयात रिजेन्सी, नगर रोड येथे सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी या सन्माननीय अतिथी म्हणून
उपस्थित असणार आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे व नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक अजय अंबेकर, मोहर ग्रुपचे अध्यक्ष व घुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला हे विशेष अतिथी
म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी प्रख्यात संगीतकार अजय, अतुल गोगावले यांची विशेष उपस्थिती असणार आहे़ समारंभाचे अध्यक्षस्थान लोकमत समूहाचे अध्यक्ष खासदार विजय दर्डा भूषवणार आहेत.
लोकसंस्कृतीचे गाढे अभ्यासक, संशोधक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. रा. चिं. ढेरे यांना ‘लोकमत जीवनगौरव पुरस्कारा’ने गौरवण्यात येणार आहे.
१ लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याखेरीज नऊ साहित्यप्रकारांतील प्रतिभावंत लेखकांचा ‘लोकमत साहित्य पुरस्कारा’ने सन्मान होणार आहे. पुरस्कारप्राप्त साहित्यिकांमध्ये कथा विभागात सतीश तांबे, कादंबरी विभागात नामदेव माळी, कविता विभागात श्रीधर नांदेडकर, ललित गद्य विभागात अतुल धामनकर, ललितेतर गद्य विभागात एम. डी. रामटेके, चरित्र-आत्मचरित्र विभागात अरविंद जोग, वैचारिक समीक्षा विभागात प्रा. प्रकाश पवार, अनुवाद विभागात धनश्री हळबे, विज्ञान विभागात देशोदेशीचे पाणी व इतर चार पुस्तके लिहिणारे मुकुंद धाराशिवकर यांचा समावेश आहे.
प्रत्येक वाङ्मयप्रकारातील विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट मुखपृष्ठासाठी चित्रकार सतीश भावसार यांची निवड करण्यात आली आहे. ११ हजार रुपये, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील साहित्यिकांची दखल घेऊन त्यांच्यातून चांगल्या साहित्यकृती निवडून त्यांच्या पाठीवर कौतुकाची व प्रोत्साहनाची थाप देण्यासाठी लोकमत समूहाने सुरू केलेल्या साहित्य पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे.
लोकमत साहित्य पुरस्कारांतर्गत गेल्या वर्षभरात प्रकाशित झालेल्या राज्यभरातील साहित्यकृती विचारात घेण्यात आल्या होत्या. परीक्षक मंडळात प्रा. डॉ. द. ता. भोसले, निरंजन घाटे, अरुणा ढेरे, नीरजा आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)