'आज खूप कमी लोक त्या जबाबदारीने चित्रपट बनविताना दिसतात...' नसरुद्दीन शाह यांची खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 02:44 PM2022-12-04T14:44:09+5:302022-12-04T14:44:22+5:30
चित्रपट निर्मिती म्हणजे एक टीमवर्क असते. ते कुणा एक-दोघा व्यक्तीचे श्रेय नसते
पुणे : चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही. ती खूप मोठी जबाबदारी आहे, पण आज खूप कमी लोक त्या जबाबदारीने चित्रपट बनविताना दिसतात, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह व्यक्त केली. ओटीटी हे मनोरंजनाचे भवितव्य आहे. आगामी २५ ते ३० वर्षांमध्ये चित्रपटाचे अस्तित्व संपेल आणि चित्रपट पाहणे हा सार्वजनिक अनुभव राहणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये रंगभूमीवरील ‘अस्सल’ कलाकार नसरुद्दीन शाह यांचा संवादात्मक कार्यक्रम आयोजित केला होता. शाळेतील मुलांच्या प्रश्नोत्तरांना दिलखुलासपणे उत्तरे देत, त्यांनी कार्यक्रम रंगविला.
शाह म्हणाले, कलाकाराला एखादे पात्र उलगडून सांगणे हाच मूर्खपणा आहे. कलाकारांनी थिअरीमध्ये अडकता कामा नये. त्या पात्राला काय सांगायचं आहे, ते समजून उमजून अभिनय केला पाहिजे. कारण कोणताही निष्कर्ष हा टिपिकल असू शकतो. सध्याच्या तरुण कलाकारांच्या कामावर मी खूप खूश आहे. आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाखाली शिकायचं आहे, असे जेव्हा ते आग्रह धरतात, तेव्हा त्यांना मी एकच सल्ला देतो की, कशाला कुणी हवंय? स्वत: काहीतरी निर्मित करा आणि लोकांना दाखवा. भलेही पाहण्यासाठी तुमचे दोनच मित्र का असेना. स्वत: शिका आणि करा, कुणावर अवलंबून राहू नका.
कोणत्याही कलाकाराला आयुष्यात यश-अपयशाचा सामना करावा लागतोच, पण त्याचा माझ्यावर कधीच परिणाम झाला नाही. मी वस्तू नाहीये. काही कलाकार विकले जातात. त्यात त्यांचा दोष नाही. चांगले जीवन जगावेसे वाटणे, यात गैर काहीच नाही. मीही उपाशी राहणे, हाताला काम नसणे असे अनुभव घेतले आहेत, पण मला जगातला श्रीमंत माणूस व्हायचेच नव्हते. मी स्पर्धेत धावणारा घोडा नव्हतो. ज्यावेळी ‘त्रिदेव’ अनपेक्षितपणे हिट झाला. तेव्हाही मी माझे मानधन वाढविले नव्हते. त्यामुळे यश-अपयशाचा मला फारसा सेट बॅक बसला नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली.
‘फिल्म प्रॉड्यूस बाय’ विषयी प्रचंड राग
मला ‘फिल्म प्रॉड्यूस बाय’या बिझनेसविषयी प्रचंड राग आहे. चित्रपट निर्मिती म्हणजे एक टीमवर्क असते. ते कुणा एक-दोघा व्यक्तीचे श्रेय नसते, असे परखड मत नसरुद्दीन शाह यांनी व्यक्त केले.
‘व्हिलन’ची भूमिका अधिक भावते
हीरो फक्त गुडीगुडी असतो. त्यामुळे मला ‘व्हिलन’ची भूमिका करायला अधिक आवडते. ही भूमिका कशा पद्धतीने करायची, त्याच्या शक्यता व्हिलनकडे अधिक असतात. तो भूमिकेत अधिक रंग भरू शकतो, असेही शाह म्हणाले.