भीमा नदीमध्ये आज पाणी सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 01:17 AM2019-03-04T01:17:23+5:302019-03-04T01:17:26+5:30
शिरूर व हवेली तालुक्यात भीमा नदीकाठावरील गावात तीव्र पाणीटंचाई झाली होती.
लोणीकंद : शिरूर व हवेली तालुक्यात भीमा नदीकाठावरील गावात तीव्र पाणीटंचाई झाली होती. तसेच, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठा संपल्याने नागरिकांच्या पाण्याच्या मागणीबाबत पालकमंत्र्यांकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, भीमा नदीवरील बंधारे भरण्यासाठी भामा आसखेड धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आमदार बाबूराव पाचर्णे यांनी दिली.
या निर्णयामुळे हवेली-शिरूर तालुक्यात नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आमदार पाचर्णे म्हणाले, ‘भीमा नदीकाठच्या बहुतांश गावांच्या पाणी योजना, तसेच जवळच्या गावांच्याही पिण्याच्या पाण्याच्या योजना कोल्हापूर बंधाऱ्यावर अवलंबून असल्याने पाण्याअभावी योजना बंद पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. पाण्याअभावी उभी पिके ही जळून जाण्याची भीती असल्याने भीमा नदीत त्वरित पाणी सोडण्याची मागणी नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांनी केली आहे.’ भामा आसखेड धरणातील पाणीसाठ्यातून पाणी सोडल्यास खेड, हवेली, शिरूर व दौंड तालुक्यांतील शेतकऱ्यांना फायदा होईल, यासाठी आमदार पाचर्णे यांनी पाणी सोडण्याबाबत पालक मंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुटे, जिल्हा नियोजन समिती सदस्य दादासाहेब सातव, संजय सातव पाटील, संदीप भोंडवे, आदीनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
> सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांची गरज लक्षात घेऊन आज पालकमंत्री गिरीश बापट यांनी अधीक्षक अभियंता चोपडे यांना पाणी सोडण्याचे आदेश दिले असून उदयापासून (सोमवार) पाणी सोडण्यात येणार आहे.
- बाबूराव पाचर्णे, आमदार