शिवसृष्टीवर आज तोडगा, पालकमंत्र्यांचा पुढाकार; महामेट्रोचे अधिकारीही उपस्थित राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:53 AM2017-09-19T00:53:05+5:302017-09-19T00:53:07+5:30
महामेट्रोच्या नियोजित स्थानकामुळे अडलेल्या प्रस्तावित शिवसृष्टीवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी मुंबईत बैठक होत आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पुढाकारामुळे ही बैठक होत असून नगरविकास खात्याचे प्रधान सचिव नितीन करीर हेही बैठकीला उपस्थित असतील.
पुणे : महामेट्रोच्या नियोजित स्थानकामुळे अडलेल्या प्रस्तावित शिवसृष्टीवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी मुंबईत बैठक होत आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पुढाकारामुळे ही बैठक होत असून नगरविकास खात्याचे प्रधान सचिव नितीन करीर हेही बैठकीला उपस्थित असतील. त्यामुळे यावर तिथे काही निर्णय होण्याचीही शक्यता आहे.
महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती सभापती मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, कोथरूडमधील नगरसेवक व शिवसृष्टीसाठी अगदी सुरुवातीपासून आग्रही असलेले दीपक मानकर यांनाही बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. विशेष म्हणजे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित व अन्य काही अधिकारीही बैठकीला उपस्थित असतील. त्यामुळेच या बैठकीविषयी शिवप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.
मेट्रोच्या कोथरूड येथील नियोजित स्थानकाच्या जागेवर आधी शिवसृष्टी प्रस्तावित करण्यात आली होती. तसा ठराव मानकर यांनी ते उपमहापौर असताना मंजूर करून घेतला होता. त्यासाठी प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी डिझाईनही तयार केले आहे. मात्र नंतर त्याच जागेवर मेट्रोचे स्थानक निश्चित करण्यात आले व शिवसृष्टी मागे पडली. मेट्रोचे डिझाईन करणाºया दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशननेही एक तर मेट्रोचे स्थानक किंवा शिवसृष्टी असे स्पष्ट करीत महापालिकेने यावर निर्णय घ्यावा, असे सांगितले.
>ठोस निर्णयाची अपेक्षा
तत्कालीन पदाधिकाºयांनी या विषयाकडे दुर्लक्ष केले व शिवसृष्टीचा विषय तसाच राहिला. दरम्यानच्या काळात मानकर यांनी त्याच जागेवर मेट्रो स्थानकही व शिवसृष्टीही असे डिझाईन करून घेतले व शिवसृष्टीचा आग्रह कायम ठेवला. मध्यंतरी याच विषयावर त्यांनी पदाधिकाºयांना खास सभाही आयोजित करायला लावली. त्यानंतर आता पुन्हा या विषयाला पालकमंत्री बापट यांच्यामुळे गती आली आहे. महामेट्रोचे दीक्षित यांनीही दोन्ही गोष्टी होऊ शकतात, म्हणून अनुकूलता दर्शविली आहे.