‘संत तुकाराम’चे कारभारी आज ठरणार
By admin | Published: April 4, 2015 05:56 AM2015-04-04T05:56:46+5:302015-04-04T05:56:46+5:30
श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांसाठी गुरुवारी चार तालुक्यांतील विविध मतदान केंद्रांवर मतदान झाले. मुळ
पिंपरी : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांसाठी गुरुवारी चार तालुक्यांतील विविध मतदान केंद्रांवर मतदान झाले. मुळशी तालुक्यातील कासारआंबोली येथील मुलींच्या सैनिकी शाळेत उद्या शनिवारी सकाळी ८पासून मतमोजणी सुरू होणार असून, सायंकाळी सहापर्यंत सर्व निकाल हाती येऊ शकतील.
मतमोजणीसाठी निवडणूक विभागाने तयारी पूर्ण केली असून, शुक्रवारपासूनच सैनिकी शाळेत कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुळशीचे तहसीलदार प्रशांत ढगे यांनी दिली.
कार्यक्षेत्रातील मावळ, मुळशी, खेड, हवेली या तालुक्यांमधील ४२ मतदान केंद्रांवर गुरुवारी श्री संत तुकाराम कारखान्याची निवडणूक शांततेत पार पडली. मतपत्रिकेचा वापर करून हे मतदान झाल्याने मतपेट्या मोजणीकामी कासारआंबोली येथे हलविण्यात आल्या आहेत. बऱ्याच वर्षांनंतर कारखान्याची निवडणूक कार्यक्रमानुसार झाल्याने सर्वपक्षीय संत तुकाराम शेतकरी विकास पॅनलचे २१, शेतकरी परिवर्तनचे १७, तर अपक्ष १३ उमेदवारांमध्ये चांगलीच चुरस झाली. सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या वातावरणात चांगलीच चढाओढ व स्पर्धा दिसून आली. विद्यमान अध्यक्ष नानासाहेब नवले लौकिक कायम राखणार, की बाळासाहेब नेवाळे आपल्या पॅनलद्वारे परिवर्तन घडविणार, याची चर्चा रंगली आहे. काही अपक्ष उमेदवार आपल्या नातेसंबंधांचा हवाला देत विजयी होणार, असा दावा करीत आहेत. अनेक मतदार या वेळी निवडणुकीनंतर घोडेबाजार रंगणार असल्याचे भाकीत करीत आहेत. (वार्ताहर)