‘वॉटर कप’ स्पर्धेचे आज पारितोषिक वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 12:01 AM2017-08-06T00:01:42+5:302017-08-06T00:01:42+5:30
मागील वर्षी तीन तालुक्यांपासून सुरू झालेली ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धा यंदा ३० तालुक्यांमध्ये घेऊन महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले.
पुणे : मागील वर्षी तीन तालुक्यांपासून सुरू झालेली ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धा यंदा ३० तालुक्यांमध्ये घेऊन महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ‘वॉटर हिरोज्’चे कौतुक करण्याबरोबरच विजेत्यांच्या सन्मानासाठी ‘पानी फाउंडेशन’च्या वतीने उद्या, रविवारी पारितोषिक वितरण बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोटर््स कॉम्प्लेक्समध्ये सायं. ५ वाजता आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी फाउंडेशनचे सह-संस्थापक आमीर खान आणि ४००० ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. यंदा ८ एप्रिल ते २२ मे या कालावधीत ३० तालुक्यांमध्ये ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेसाठी शंभर गुणांची पत्रिका तयार करण्यात आली आहे. गावाचा ताळेबंद मांडण्यापासून वॉटर बजेट, हायड्रो मार्कर अशा गोष्टी प्रशिक्षणाच्या माध्यमातून माहिती करून देण्यात आल्या आहेत. ही चळवळ लोकवर्गणीतून उभी राहिली असली, तरी ४५ दिवसांत जलसंधारणाची सर्व कामे होणे शक्य नाही. ही रक्कम त्या कामांसाठी वापरली जावी, हा उद्देश आहे. झाडे जगली आहेत का, शोष खड्डे कार्यरत आहेत का, यावर नियंत्रण ठेवले जात आहे, त्यासाठी बक्षीस देणार असल्याचे भटकळ यांनी सांगितले.
विजेत्या तीन गावांना बक्षिसे
स्पर्धेतील विजेत्या तीन गावांना प्रत्येकी अनुक्रमे ५० लाख, ३० लाख आणि २० लाख रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी किरण राव आणि डॉ. अविनाश पोळ उपस्थित होते.